जालना : जालना औद्योगिक वसाहतीच्या चौथ्या टप्प्यासाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होत्या.

या बैठकीत सध्या शहरात अस्तित्वात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील समस्यांविषयी चर्चा झाली. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, वीज, वाहनतळ इत्यादी प्रश्नांचा विचार करून सर्वांगीण विकासाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करावा. या संदर्भात उद्योग विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

तर उद्योजकांच्या वतीने औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, पथदिवे, पाणी निचरा व्यवस्था, तिसऱ्या टप्प्याजवळील उड्डाणपूल, शहर वाहतूक व्यवस्था, वाहनतळ इत्यादी मागण्यांच्या संदर्भात पालकमंत्री मुंडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

या अनुषंगाने स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण या बैठकीस उपस्थित नव्हतो. परंतु, पालकमंत्री मुंडे आणि आपली जालना शहरातील नागरी सुविधा तसेच औद्योगिक क्षेत्रातील विकास विषयक प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीही या अनुषंगाने आपली आणि काही उद्योजकांची चर्चा झाली आहे. जालना शहर व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रामुळे ओळखले जाते. स्वतंत्र जिल्हा निर्मिती पूर्वी जालना सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाच भाग होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकाजवळ तेथील पहिली औद्योगिक वसाहत १९६५ मध्ये स्थापन झाली.

त्यापूर्वी तीन वर्षे अगोदर म्हणजे १९६२ मध्ये जालना शहरात जुनी औद्योगिक वसाहत स्थापन झाली होती. स्वतंत्र जिल्हा निर्मितीपूर्वी म्हणजे १९७५ मध्ये जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या पहिल्या टप्प्याची स्थापना झाली होती. आता या वसाहतीचा दुसरा आणि तिसरा टप्पा अस्तित्वात आहे. औद्योगिक वसाहतीच्या चौथ्या टप्प्यासाठी आता जागेचा शोध घेण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेन्द्रा औद्योगिक वसाहत आणि जालना औद्योगिक वसाहतीमधील अंतर तीस-पस्तीस किलोमीटर आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे ‘ड्रायपोर्ट’ जालना शहराजवळ उभारले जात असून, त्यामुळे या शहराचे औद्योगिकदृष्ट्या महत्त्व वाढले आहे. समृद्धी महामार्ग, चिकलठाणा विमानतळ, जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे इत्यादींमुळे जालना शहर दळणवळणाच्या सुविधांनी युक्त झालेले आहे.

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या पैठण तालुक्यातून जाणाऱ्या नियोजित महामार्गाचा विस्तार पुढे जालना शहरापर्यंत करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून केली असल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले.