परभणी : दारू पिऊन सातत्याने आईला मारहाण करणाऱ्या पित्याचा १६ वर्षीय एकुलत्या एक अल्पवयीन मुलाने राहत्या घरात पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री उशिरा तालुक्यातील इसाद येथे घडली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलास गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील इसाद येथील रहिवासी गणेश अंकुशराव भोसले (वय ४० वर्षे) हे सतत दारू पिऊन त्यांच्या पत्नीस मारहाण करायचे. अनेक दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या या प्रकाराने संतप्त झालेल्या त्यांच्या१६ वर्षीय एकुलत्या एक मुलानेच मंगळवारी रात्री १२ ते १२:३० वाजता राहत्या घरात आईस पित्याकडून पुन्हा मारहाण सुरू असताना पित्याच्या पोटात थेट चाकूने वार करत ठार मारले. या घटनेत पिता गणेश हे जागीच मृत्युमुखी पडले.

बुधवारी सकाळी घटनेचे वृत्त कळताच गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे आदि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एकंदरीत घटनेचा पंचनामा नोंदविला आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी मुलास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली.