परभणी : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी (दि. २) येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रास्ताविकाची मागील वर्षी १० डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने विटंबना केली होती. या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंद दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाला नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे मागील वर्षी १५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आले होते.
याप्रकरणी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने याप्रकरणी ४ जुलैला एक आठवड्यात गुन्हे दाखल करण्याचे नवा मोंढा पोलिसांना आदेश दिले होते. तसेच सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या अर्जाचा या कामी आधार घेण्याचे बजावले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम ठेवला. राज्य सरकारची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शनिवारी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात नवा मोंढा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.