परभणी : झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्सी या बहुचर्चित व वादग्रस्त निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना अखेर पोलिसांनी आज मंगळवारी (दि.२२)पहाटे अटक केली. या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल नऊ पथकांच्या माध्यमातून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर बाराव्या दिवशी पोलिसांना यात यश आले. दरम्यान, या दाम्पत्यास मंगळवारी दुपारी पूर्णा येथील न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
उखळद या गावचे हभप जगन्नाथ महाराज हेंगडे हे आपल्या तिसरीत शिकणार्या मुलीचा शाळा सोडण्याचा दाखला आणण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत १० जुलैला रोजी गेले होते. त्यावेळी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी हेंडगे यांना हा दाखला देण्यास स्पष्ट नकार दिला व पैसे भरा असे सांगून शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे हेंडगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी चव्हाण दाम्पत्याविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, घटना घडल्यानंतर चव्हाण दाम्पत्य बेपत्ता झाले.
बारा दिवस उलटले तरीही आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश येत नव्हते. अखेर आज पहाटे या दांपत्याला शोधून काढण्यास पोलिसांना यश मिळाले. या दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यात आली असली तरी या संदर्भातला सविस्तर तपशील पोलिसांकडून कळू शकला नाही.
खुनाच्या गुन्ह्यातील या दोन्ही आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सातत्याने दबाव वाढत होता. विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. एवढेच नाही तर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनावर मोर्चा काढला होता. अखेर या दांपत्यास पोलिसांनी आज अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, सिध्देश्वर शिवणकर, विलास सातपुते, शरद सावंत यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती, उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, जयश्री आव्हाड व वाघमारे यांच्या सहकार्याने आरोपीस मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले.