परभणी : जिल्ह्यात आज गुरुवारी (दि.३०) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून वेचणीसाठी आलेल्या कापसाचीही या पावसाने माती केली आहे. कालपासूनच आकाश ढगाळ होते मात्र आज सकाळीच पावसाने बरसायला प्रारंभ केला. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असून अतिवृष्टीतून ज्या ठिकाणचे कापसाचे क्षेत्र वाचले त्या ठिकाणी वेचणीला आलेला कापूस आता या पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. दुसरीकडे रब्बीच्या पेरण्यांचा खोळंबाही या पावसाने केला आहे.
काल बुधवारी ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. आज मात्र सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या कापूस फुटलेला आहे. दिवाळीच्या काळात वेचणीसाठी मजूर न मिळाल्याने हा कापूस तसाच राहिला होता. आज झालेल्या पावसाने शेतातला वेचणीसाठी आलेला कापूस भिजला असून हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फटका आहे. एकाच वेळी कापूस सर्वत्र फुटल्याने वेचणीसाठी मजूर महिला मिळत नाहीत, नेमक्या याच काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारा उरला सुरला कापूसही आता हातातून गेला आहे.
अतिवृष्टीच्या फटक्याने आधीच सोयाबीनने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. चार हजार रुपयांचा दर सोयाबीनला असून पावसामुळे उत्पादनाचा दर्जाही निकृष्ट झाला आहे. अतिवृष्टीचे संकट येऊन गेल्यानंतर जो काही कापूस उरलेला आहे त्याची आता वेचणी करता येईल आणि हाती लागलेल्या कापसाची काहीतरी मदत होईल अशी अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या सुरू झालेल्या पावसाने आणखीच काळजीत टाकले आहे. दिवाळी संपल्याबरोबर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला पण गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे. या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांचे खरीपापाठोपाठ रब्बीचेही नियोजन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमधील झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून कुठे वार्षिक सरासरीच्या दीडपट पाऊस झाला आहे. पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतात जाणेच अवघड होऊन बसले आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात शेत रस्त्यांचा प्रश्न असल्याने अशा पावसात मशागतीची कामे करणे शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे.
