परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर सोयाबीनची उत्पादकता व गुणवत्तेवरही परिणाम झाल्याने मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी केली. बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक वाढल्यानंतर आता कुठे शासकीय खरेदीची नोंदणी सुरू झाली असून, १५ नोव्हेंबरनंतर जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी प्रक्रिया चालू होणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेले सर्व सोयाबीन व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर ही शासकीय खरेदी सुरू होत असल्याने ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया म्हणजे ‘वराती मागून घोडे’ अशी झाली आहे. जिल्ह्यात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेले सोयाबीन, मूग, उडीद मिळेल त्या भावात बाजारात विकण्यास काढले पण त्याला हमीभावापेक्षाही कमी भाव खुल्या बाजारात मिळत आहे. त्यामुळे शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी वाट पाहत होते. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना विकली आहे. आता वरातीमगून घोडे या म्हणीप्रमाणे शासनाच्या सोयाबीन खरेदीला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई आणि नाफेडच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभाव दराने खरेदी केंद्र येत्या १५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरू होणार आहेत.

केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावानुसार मूग ८ हजार ७३६ रु. प्रतिक्विंटल, उडीद ७ हजार ८०० रु. प्रतिक्विंटल आणि सोयाबीन ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जिंतूर तालुका जिनिंग ॲण्ड प्रेसींग सहकारी सोसायटी लिमिटेड जिंतूर, पूर्णा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ पूर्णा, मानवत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मानवत, स्वप्नभूमी सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था सोनहारी वेअर हाऊस शेळगाव, ता. सोनपेठ, तुळजाभवानी कृषी विकास सेवा सहकारी संस्था मर्यादीत बोरी, परभणी तालुका सहकारी खरेदी विक्री सेवासंघ परभणी, नवा मोंढा परभणी, भूमिपुत्र फळे व भाजीपाला खरेदी, विक्री व प्रसंस्करण सहकारी संस्था वरपूड ता. परभणी आणि कृषीराज फळे आणि भाजीपाला खरेदी विक्री व प्रसंस्करण सहकारी संस्था मर्यादीत मिरखेल, झरी ता. परभणी या खरेदी केंद्रांवर हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.

हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, पीक पेरा आदी कागदपत्रांसह शेतकऱ्याने प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच खरेदीसाठी मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील यांनी केले आहे.