What is the Parth Pawar Land Scam Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर सध्या जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत. पुण्याच्या मुंढवा भागातील जमिनीच्या खरेदीमध्ये पार्थ पवार यांनी शुल्क रक्कम कमी दाखवून कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांसंदर्भात जमिनीच्या खरेदीसाठीचं Index II पुरावा म्हणून दिलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भातली काही कागदपत्रंही शेअर केली आहेत. मात्र, यातील इंडेक्स टू मधील काही चुका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अधोरेखित करून सांगितल्या आहेत.

पार्थ पवारांचं जमिनीबाबतचं नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील सदर जमिनीचा खरेदी व्यवहार तब्बल १८०४ कोटींचा असूनही तो कागदोपत्री फक्त ३०० कोटींचा असल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे. खरेदी व्यवहारावरील १२६ कोटींची स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी हा खटाटोप झाल्याचा मुख्य आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, व्यवहार ३०० कोटींचा दाखवून नंतर आलेली २१ कोटींची स्टॅम्प ड्युटीदेखील माफ करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. त्यासाठी त्यांनी काही कागदपत्रंही सादर केली असून त्यातच हा इंडेक्स टू चा कागद समाविष्ट आहे.

काय आहे जमीन गैरव्यवहारातील कागदावर?

या कागदावर जमीन नेमकी कुठे आहे? किती आहे? व्यवहाराचं नेमकं शुल्क किती आहे? व्यवहार करणाऱ्या पक्षकारांची नावं काय आहेत? व्यवहाराची तारीख किती आहे? त्यासाठी किती मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली? अशी माहिती आहे.

parth pawar pune land scam news in marathi
पार्थ पवार यांच्यावरील आरोपांसाठी विजय कुंभार यांनी शेअर केलेला पुरावा (फोटो – X/Vijay Kumbhar)

यात पक्षकाराचे नाव अमेडिया एंटरप्रायजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील असं आहे. हेच दिग्विजय अमरसिंह पाटील पार्थ पवार यांचे अमेडिया एंटरप्रायजेसमधील भागीदार असल्याचं अंजली दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. मात्र, या कागदावरील काही मोठ्या चुका विजय कुंभार यांनी नमूद केल्या आहेत.

मुंढवा तुळशी तालुक्यात, तर दिग्विजय पाटील ‘स्त्री’!

“यात मुंढवा भाग पुण्यातील मुळशी तालुक्यात असल्याचा उल्लेख केला आहे तर अमेडिया एंटरप्राईजेसचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या नावापुढे चक्क स्त्री लिहिलेले आहे. या चुका वरकरणी किरकोळ वाटत असल्या तरी त्या तशा नाहीत. हा मालमत्तेचा विषय असतो. या बाबतीमध्ये छोटीशी चूकसुद्धा मोठा आणि विपरीत परिणाम करू शकते. या विषयाला खूप कंगोरे आहेत”, असं विजय कुंभार यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या कागदावर दिग्विजय पाटील यांचं वयदेखील ० लिहिण्यात आलं आहे!

“मुंढवा भाग पार्थ पवारांच्या सोयीसाठी मुळशी तालुक्यात गेला का? काल पुण्यातील ४० एकर जागेच्या व्यवहाराची बातमी प्रसिद्ध झाली. त्यात इतर मोठे घोटाळे तर आहेतच. परंतु घाई गडबडीत आणि कोणाच्या तरी दबावाखाली काम केले तर कशा चुका होतात हेही त्यातून सिद्ध झालं आहे”, असंही कुंभार यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.