नागपूरपाठोपाठ पतंजली उद्योग समूहाच्या वतीने आता नगरमध्ये बस्तान बसविले जाणार आहे. पतंजलीने आता दुग्ध व्यवसायात उडी घेतली असून, नगर जिल्ह्य़ातील खडकाफाटा (ता. नेवासे) येथे त्यांचा पहिला दूध प्रकल्प सुरू होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आता त्यांच्या दुग्धजन्य पदार्थाची टक्कर राज्यातील सहकार तसेच खासगी क्षेत्रांबरोबर होणार आहे.

पतंजलीचा तूप व दुग्धजन्य पदार्थनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरू  रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

खासगी कंपन्यांकडून गायीचे तूप व दुधाची पावडर खरेदी करून त्याची विक्री पतंजलीच्या बॅण्डनेमने केली जात होती. पहिल्या टप्यात कॅडबरीला टक्कर देणारा एनर्जीबार, बोर्नविटाशी स्पर्धा करणारा पॉवरविटा ही दुग्धजन्य उत्पादने बाजारात आणली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ते डेअरी उत्पादनात उतरले आहे. त्याकरिता त्यांनी राज्यात सर्वाधिक दूध असलेल्या नगर जिल्ह्य़ाची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. शुद्ध  प्रतीच्या देशी गायींची निर्मिती करण्याकरिता सुमारे २५० कोटींचे ५० वळू ब्राझिलवरून आयात केले असून, जागा मिळाल्यानंतर नेवाशात गोशाळा सुरू करण्यात येणार आहे.

नेवाशातच प्रकल्प का?

चार जिल्ह्य़ांना मध्यवर्ती ठिकाणी खडकाफाटा (ता. नेवासे) हे नगर-औरंगाबाद महामार्गावर आहे. औरंगाबाद येथील विमानतळावरून मोटारीने अवघ्या एक तासात तेथे पोहोचता येते. शिर्डी येथील विमानतळही जवळ आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर तसेच आंध्र, कर्नाटकशी जोडणारे महामार्ग व दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील श्रीरामपूर, नगर तसेच औरंगाबाद, लासूर स्टेशन ही रेल्वेस्थानके जवळ असल्याने देशभर डेअरी उत्पादनांची वाहतूक करणे सोपे जाते.

श्रद्धेचा खुबीने वापर

दुधाचे संकलन करण्यासाठी शेतकरी संघटना, तरुण मंडळे, वारकरी हे माध्यम पतंजलीने मोठय़ा खुबीने वापरले आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमात त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. ग्रामीण भागात हा घटक दूध धंद्यात आहे. तसेच गायीच्या दुधाबरोबरच गोमूत्र व शेणही पतंजली विकत घेणार आहे. राज्यात दूध व्यवसायात हे प्रथमच घडत आहे. पतंजलीने या पूर्वीच पशुखाद्य बाजारात आणलेले आहेत. नेवासे येथील प्रकल्पाची क्षमता पाच लाख लिटरपासून ते १६ लाख लिटपर्यंत नेण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

डेअरी उद्योगाचे सध्याचे स्वरूप

डेअरी उद्योगाची देशात तीन लाख कोटींची सध्या उलाढाल आहे. २०२२ मध्ये ती २२ लाख कोटींवर जाईल असा रामदेवबाबा यांचा दावा आहे. गुजरातच्या अमूल व कर्नाटकच्या नंदिनी यांची उलाढाल ५० हजार कोटींच्या पुढे आहे. ब्रिटानिया, नेस्ले यांच्याप्रमाणेच त्यांची गोदरेज, वारणा, गोकुळ, राजहंस, महानंदा, प्रभात, मदर डेअरी, सरस, वाडीलाल, गोवर्धन या सहकारी व खासगी कंपन्यांशीही स्पर्धा होणार आहे. फ्युचर ग्रुपबरोबर पतंजलीचा यापूर्वीच करार झालेला आहे. त्यामुळे मॉल व सुपरमार्केटमध्ये त्यांच्या दूध प्रक्रिया उत्पादनांना स्थान मिळेल. नगर व पुणे जिल्ह्य़ातील सहकाराशीही त्यांची भावाच्या बाबतीत भविष्यात स्पर्धा होऊ शकते.