परभणी : जिल्ह्यातील पाथरी येथील श्री. साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पाच वर्षांपूर्वी तयार झाला. मुख्य सचिवांसमोर या २०० कोटी रुपयांच्या आराखडय़ाचे अनेक वेळा सादरीकरण झाले मात्र अद्यापही विकास आराखड्याच्या कृती कार्यक्रमाला गती आली नाही. शासनाने दिलेला ५२ कोटी रुपयांचा विकास निधी तसाच पडून आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांमध्ये असलेले मतभेद आणि श्रेयवादाची लढाई याचीही किनार या दिरंगाईला कारणीभूत आहे. दाेन वर्षापूर्वी या आरखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर अशी अवस्था

श्री. साईबाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरी येथे तत्कालीन सरकारने जन्मभूमीचा विकास व्हावा, यासाठी निधी व मंजुरीबाबतची घोषणा केली होती. त्यासाठी नगर परिषद पाथरी व जिल्हाधिकारी परभणी यांनी यापूर्वी तीनवेळा श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत त्यास मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीत त्यास अंतिम मंजुरी देण्यात येणार होती.

तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी, सीताराम कुंटे यांनी ४ जून २०२१, तर मनुकुमार श्रीवास्तव यांनी २० सप्टेंबर २२ रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठका घेतल्या. परंतु वारंवार त्रुटी दाखवीत सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. एवढ्या सोपस्कारानंतर एकदाची आराखड्याला मंजुरी मिळाली. भूमी अधिग्रहण व प्रशासकीय खर्च यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला. मात्र हा निधी तसाच पडून आहे.

पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींच्या आराखडय़ाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. पाथरी येथे तीर्थक्षेत्र विकास म्हणून निधी देण्यास आमची हरकत नाही, मात्र जन्मभूमी म्हणून हा निधी दिला जाऊ नये, अशी भूमिका शिर्डी संस्थान व त्या परिसरातील राजकीय नेत्यांनी घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांनी तूर्त या विषयावर वाद नको. आधी निधी पदरात पाडून घ्या.

पाथरीचा विकास करा जन्मभूमीच्या वादाचे नंतर पाहू असे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सूचित केले होते. शासनाने पाथरीसाठी दिलेला निधी साईबाबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा म्हणून दिल्याचे स्पष्ट केले होते. पाथरी नगरपालिकेच्या खात्यात त्यानंतर सरकारचे ५२ कोटी रुपये जमा झाले. त्यावेळी तुकाराम कदम हे पाथरी पालिकेचे मुख्याधिकारी होते. दोन रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. पुढे या सर्व प्रकरणात राजकारण शिरले. कामाला गती मिळाली तर श्रेय कोणी घ्यायचे यावरून थेट सर्वच कामांना थांबवण्यात आले.

प्रशासनाने तयार केलेला साई जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा १७८ कोटी रुपयांचा होता. हा आराखडा चार टप्प्यांमध्ये तयार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ६५ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात ३८ कोटी १४ लाख रुपये, तिसऱ्या टप्प्यात ४० कोटी ६९ लाख रुपये आणि चौथ्या टप्प्यात ३१ कोटी १ लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले.

पाथरीत बाबाजानी दुर्राणी विरुद्ध सईद खान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यातूनच सर्व कामे रखडली केली. आता नव्याने पाथरीचे आमदार झालेले राजेश विटेकर यांनी या कामी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

आराखड्यात काय आहे ?

मंदिराच्या २०० मीटरच्या आतमध्ये भूसंपादन करून मंदिराचा परिसर सुशोभित करणे, रस्त्यांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिरापर्यंत बाहेरून येणारे रस्ते प्रशस्त करणे, प्रवचन हॉल, मोकळय़ा जागा विकसित करणे अशा बाबींचा आराखडय़ात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. ५२ कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला आहे. जिल्हाधिकारी व पाथरी नगरपरिषद यांचे संयुक्त बँक खाते आहे. निधी मिळूनही कोणतीच कामे मार्गी लागली नाही परिणामी हा निधी विनियोगाअभावी तसाच पडून आहे.