पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या लावणीचे शब्द मनात रूंजी घालावेत या पध्दतीने सतारीवरती मोर नाचरा हवा या शब्दांची आठवण यावी अशी मयुरपंखी रंगातील सतार मिरजेच्या युवा तंतुवाद्य कारागिरांनी बनवली आहे. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा ही गदिमांनी लिहीलेली आणि  सुलोचनादीदींच्या स्वरसाजाने मराठी मुलखात अजरामर केलेली लावणी.

तंतूवाद्य  निर्मितीमध्ये मिरजेचे नाव विश्‍वविख्यात आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या तंतूवाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. पारंपारिक स्वराची जोपासना करीत तंतूवाद्य आधुनिकतेची कास धरत नवनवीन प्रयोग तंतूवाद्य निर्मितीमध्ये केले जात आहेत. पूर्वी पारंपारिक रंगात उपलब्ध असणारी तंतूवाद्ये आता आकर्षक अशा विविध रंगात उपलब्ध होऊ लागली आहते. सतारी, तंबोरे यांना रंगीबेरंगी मेटॅलिक रंग देण्यात येऊ लागले आहेत.

नईम सतारमेकर यांनी नुकतीच मयुरपंखी रंगातील आकर्षक सतार बनविली आहे. प्रसिध्द चित्रकार उगारे बंधूंनी त्यावर कलात्मक रंगकाम केले आहे. मिरजेत तयार होणार्‍या या विविध रंगातील या सतारी आणि तंबोर्‍यांना  देश-परदेशातील कलाकारांकडून पसंती मिळत आहे.

 युवा कारागिर आता तंतूवाद्य निर्मितीत आधुनिक प्रयोग करीत आहेत. पारंपारीक वाद्य निर्मितीला नव्या प्रयोगांची जोड देत जुनी वाद्ये अधिक लोकप्रिय कशी होतील, याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयोगाचा एक भाग म्हणून तंतूवाद्यांना पारंपारीक रंग न देता ग्राहकांना आकर्षित करतील, असे रंग आता देण्यात येऊ लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तंतूवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करुन तो तंतूवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. पत्रीलाख पातळ करुन त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकीरी, यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. आता मात्र, हीच तंतूवाद्ये नव्या, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यासाठी मेटॅलिक रंगांचा वापर होऊ लागला आहे. स्वरामध्ये कोणतीही तडजोड न करता आकर्षक अशा रंगात मिळत असल्याने ग्राहकांची पसंती त्याला मिळत आहे. येथील युवा कारागीर नईम सतारमेकर यांनी एका कलाकाराच्या मागणीनुसार मयूरपंखी रंगातील आकर्षक सतार बनवून दिली आहे. अक्षरश: पिसारा फुललेला मोरच या सतारीवर अवतरला आहे. मिरजेतील प्रसिध्द चित्रकार महमंदसिराज उगारे, उस्मान उगारे, मुामिल उगारे यांनी या सतारीवर सुबक असे रंगकाम केले आहे.