लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून देशभर फिरत आहेत. लोकांनी बदलाचे प्रयोग पूर्वीही करून पाहिले आहेत. दिल्लीत बदल केला व २००४ मध्ये पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. १९९५ मध्ये राज्यात बदल केला व साडेचार वर्षांत पुन्हा काँग्रेसकडे सत्ता आली. ती १४ वर्षांपासून काँग्रेसकडेच टिकून आहे,आता बदलाच्या आवाहनांना जनता भुलणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
लातूरच्या टाऊन हॉलच्या मदानावर शनिवारी काँग्रेसच्या वचनपूर्ती जनजागरण यात्रेच्या शुभारंभप्रसंगी चव्हाण बोलत होते. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार जयवंत आवळे, आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख आदी उपस्थित होते. विरोधकांकडे कोणताही पर्याय नाही. केवळ शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे यावरच त्यांचा भर आहे, अशी टीका करून चव्हाण म्हणाले, ह्लशिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आदी सर्वच क्षेत्रांत काँग्रेसने केलेल्या विकासावर जनतेचा विश्वास आहे.
कोणी कितीही भूलथापा मारल्या, तरी लोकांचा काँग्रेसवरच विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले,‘ केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, की त्याचा लाभ निवडणुकीत होतो, हे विलासरावांच्या काळात यवतमाळ जिल्हय़ात आपण अनुभवले आहे. त्यांचाच विचार घेऊन आपण जनजागरण यात्रा राज्यभर सुरू ठेवत आहोत’ आगामी निवडणूक ‘आरएसएस’विरुद्ध काँग्रेस अशी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना तलवार भेट दिली. लातूर जिल्हय़ातील काँग्रेस राज्यात क्रमांक एकवर आहे. लातूर कवचकुंडले म्हणून आगामी काळात काम करेल, असे त्यांनी सांगितले.
आयुक्तालय, ऊसदरासाठी घोषणा
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर िझदाबाद’च्या घोषणा देत काही भीमसनिकांनी लातूरला आयुक्तालय झालेच पाहिजे, ही मागणी सुरू ठेवली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. थोडय़ाच वेळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसभावासंबंधी घोषणा सुरू करताच त्यांनाही पोलिसांनी पकडून नेले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न विविध संघटनांनी केला.