पाचशेहून अधिक रुग्ण; मृत्यूंबाबत दावे-प्रतिदावे
नागपूर : गेल्यावर्षी कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन पन्नासावर शेतकरी, शेतमजुरांचा बळी गेल्यावरही शासकीय यंत्रणा सुधारण्याचे नाव घेत नाही. यंदाही विदर्भाच्या विविध जिल्ह्य़ांमध्ये वरील कारणांमुळेच पाचशेहून अधिक शेतकरी व शेतमजुरांना बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. कीटकनाशकामुळे दहा जणांचा मृत्यू झाला असला तरी याबाबत आरोग्य विभागातच एकमत नाही. याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहे. आरोग्य विभागाकडून हे मृत्यू कीटकनाशक फवारणीमुळे बाधा झालेले नसून कीटकनाशक प्राशन केल्याने म्हणजे आत्महत्या केल्याने झाल्याचा दावा केला जात आहे.
कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याचे प्रकरण गेल्यावर्षी गाजले होते. याबाबत सरकारवर टीकाही झाली होती. े यावर उपाययोजना करण्याचे जाहीरही केले .जनजागृती हा त्यातलाच एक प्रकार होता. परंतु त्याची व्याप्ती कमी असल्याने यंदाही ही समस्या उद्भवली. शेतकरी कीटकनाशक फवारणी करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करीत नाही. कृषी खात्यानेही आवश्यक साधने उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळेच यंदाही विदर्भात रुग्णांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होते.
आरोग्य उपसंचालक कार्यालय अकोलाच्या नोंदीनुसार त्यांच्या आखत्यारित येणाऱ्या पाच जिल्ह्य़ांमध्ये यंदाच्या हंगामात एक एप्रिल ते आजपर्यंत ४५० हून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक रुग्ण हे यवतमाळ जिल्ह्य़ात १२७ रुग्ण आढळले. अकोला जिल्ह्य़ात १९४ तर अमरावतीसह इतरही जिल्ह्य़ांमध्ये कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये रुग्णांबाबत आरोग्य विभागच गोंधळलेला आहे. सहा जिल्ह्य़ात ४८ रुग्ण आढळल्याचे सांगते, परंतु गेल्या आठवडय़ात गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात १२३ रुग्ण आणि ७ मृत्यू नोंदवले गेले होते. परंतु त्यानंतर आरोग्य विभागाच्या पडताळणीत बहुतांश मृत्यू हे कीटकनाशक प्राशन करून झाल्याचे पुढे आले आहे. त्यातच तेथील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नवीन अहवालात तेथील मृत्यू सोडा एकही रुग्ण आढळला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आकडेवारीचा घोळ आहे. नागपूर जिल्ह्य़ातही अद्याप आरोग्य विभागाला एकही रुग्ण आढळला नसल्याचे त्यांचा अहवाल सांगत असून या विभागातील वर्धा जिल्ह्य़ात ३३ रुग्ण आढळले आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरा!
बहुतांश शेतकरी कीटकनाशकांची निवड आणि त्याचा वापर याबाबत कृषी सेवा केंद्र संचालकांच्या सल्ल्यावरच विसंबून असतात. कोणती कीटकनाशके किती विषारी आहेत, त्याचे प्रमाण किती वापरायचे, ते कोणत्या पिकांसाठी उपयोगी आहे, वापरताना सुरक्षेचे कोणते उपाय घ्यायचे, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही कृषी खात्याची आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. दरम्यान, औषधांच्या तपासणीशी संबंधित विविध शासकीय संस्थाही विक्री होणाऱ्या कीटकनाशकांना इतर देशात प्रतिबंध आहे काय? हे तपासले जात नाही. त्यामुळे चुकीच्या कीटकनाशकांमुळे कुणी आजारी वा दगावल्यास संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाच दोषी ठरवण्याची गरज आहे. सोबत शेतकऱ्यांचे या संदर्भात प्रबोधन गरजेचे आहे.
-डॉ. अमिताभ पावडे, कृषी क्षेत्रातील अभ्यासक
यवतमाळ मेडिकलची तत्परता
यवतमाळ जिल्ह्य़ात २०१७ मध्ये कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याने ५०७ शेतकरी व शेतमजूर विविध रुग्णालयांत दाखल झाले होते. त्यातील २३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक रुग्ण यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले होते. त्यातील उपचारादरम्यान १३ रुग्ण दगावले होते. यंदा वैद्यकीय यंत्रणेने रुग्णांसाठी स्वतंत्र डॉक्टरांचे पथक व वार्ड सुरू करून रुग्णांना तातडीने उपचार केले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतली, असे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.
नागपूर विभागात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेले रुग्ण आढळले असले तरी कोणाचाही मृत्यू नोंदवण्यात आला नाही. काही जिल्ह्य़ांत या संदर्भात नोंदी घेताना चुका झाल्या. त्यामुळे मृत्यूचा आकडा फुगला होता, परंतु पडताळणीत हे मृत्यू कीटकनाशक प्राशनाचे असून त्याच्या संपर्कात आल्याने झालेले नसल्याचे स्पष्ट झाले. तातडीने ही दुरुस्ती आरोग्य विभागाने केली आहे. या प्रकरणात चुकीचे आकडे दाखवणाऱ्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
-डॉ. संजय जयस्वाल, आरोग्य उपसंचालक, नागपूर
