केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेला बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे. ‘पीएफआय’ संघटनेला अरब देशातून ‘टेरर फंडिंग’ मिळत असल्याचं वक्तव्य सोमय्या यांनी केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत हा आरोप केला आहे.
तसेच किरीट सोमय्यांनी ‘पीएफआय’वर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी संबंधित व्हिडीओत सोमय्या म्हणाले, “पीएफआय वर प्रतिबंध लावल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही धन्यवाद देतो. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. अरब देशांतून पीएफआयला ‘टेरर फंडिंग’ (दहशतवादी कारवाया करण्यासाठी मिळणारा निधी) मिळत होतं. या संस्थेकडून ज्या काही देशद्रोही कारवाया केल्या असतील, त्यावर कारवाई होणार म्हणजे होणार…”
हेही वाचा- गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल? नेत्याने स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अॅण्ड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.
हेही वाचा- “सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान
मंगळवारी तपास यंत्रणांनी या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. यात महाराष्ट्रासह सात राज्यांत छापेमारी करण्यात आली. दिवसभरामध्ये तब्बल १७० जणांना अटक करण्यात आल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास ही संघटना बेकायदेशीर असल्याची घोषणा केंद्रातील मोदी सरकारने केल्याचं वृत्त ‘एएनआय’ या वृत्त संस्थेनं दिलं आहे.