Phaltan Women Doctor Death Case : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेले आहेत.
या घटनेतील आरोपींमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकासह आणखी एकाचा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला आज पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
वृत्तानुसार, फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एक प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक हा अद्यापही फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झालेले आहेत.
#UPDATE | Tushar Doshi, SP Satara Police, says, "Police arrested Prashant Bankar, one of the two accused in the suicide case of a woman doctor in Phaltan taluka. He will be produced in court today. The other accused, Police Sub-Inspector Gopal Badne, is still absconding and a… https://t.co/BLfSYJaFRo
— ANI (@ANI) October 25, 2025
राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या या प्रकरणात राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, “आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे. खरं तर अशी घटना घडणं हे अत्यंत संतापजनक आहे. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोन्हीही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच मी स्वत: या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
“या महिला डॉक्टरने पोलिसाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसाची देखील डॉक्टर महिलेच्या विरोधात तक्रार होती. आता आणखी सविस्तर माहिती आपल्याकडे येईल. पण या महिला डॉक्टरच्या विरोधात का तक्रार होती? याची देखील माहिती समोर येईल. एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्याच्या पाठिमागचं कारण काय होतं? यांचही कारण समोर येईल. मात्र, अशा घटना घडू नये”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
