कराड : बहूचर्चित हणबरवाडी- धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर होती. त्यासाठी आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यातून हणबरवाडी उपसा सिंचन योजनेस २०२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अग्रक्रम समितीची बैठक संपन्न झाली. त्यात हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेसाठी २०२ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याचे ‘कराड उत्तर’चे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये गेली २५ वर्षे गाजत असलेली हणबरवाडी- धनगरवाडी उपसा सिंचन योजना आमदार मनोज घोरपडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज पूर्णत्वास जात असून, धनगरवाडी टप्पा क्रमांक एकचे काम पूर्ण झाले आहे. टप्पा क्रमांक दोनचे काम प्रगतिपथावर आहे. हणबरवाडी टप्पा क्रमांक एक पूर्ण झालेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हणबरवाडी- धनगरवाडी उपसा सिंचन योजनेसाठी २०२ कोटी ७४ लाख रुपये मंजूर झाल्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होवून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खळाळणार आहे. पूर्व भागाचा कायमचा दुष्काळ मिटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले आहे.