हिंगोलीतील हळद संशोधन प्रक्रियेला गती देण्यासाठी आराखडा

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यवतमाळ, बुलढाणा,वाशीम, नांदेड,परभणीसह इतर जिल्ह्यातून हळद विक्रीला येते.

|| तुकाराम झाडे

हिंगोली: जिल्ह्यात हळदीची मोठी बाजारपेठ. व्याप्ती एवढी की हळद बेण्याची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता ८० हजार मेट्रिक टनाची. परंतु हळदीच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा व्हाव्यात म्हणून हळद संशोधन केंद्र व प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत या संदर्भात एक आराखडा संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठवला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.

  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यवतमाळ, बुलढाणा,वाशीम, नांदेड,परभणीसह इतर जिल्ह्यातून हळद विक्रीला येते. जिल्ह्यातील ४१हजार ५३८ हेक्टरावर हळदीचे लागवड होते. त्यातून आठ लाख ७२ हजार २९८ मेट्रिक टन ओेली हळद आणि काढणीपश्चात एक लाख ७४ हजार ४६० मेट्रिक टन असून हळद पिकाच्या लागवडीमध्ये सेलम जातीचे बेणे ९० टक्के वापरले जाते. तसेच कृष्णा, राजापुरी, रोमा, प्रगती, प्रतिभा या जातीचा दहा टक्के वापर केला जातो.

  हळद लागवडीसाठी आवश्यक बेणे त्या-त्या गावातील किंवा परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांमार्फत व कृषीनिविष्ठा पुरवठादारामार्फत उपलब्ध होते. तसेच कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरतून बेणे उपलब्ध होते. हळद पिकाच्या उत्पादनवाढीसाठी शुद्ध बेण्याचा उपलब्धतेची मोठी अडचण आहे. उतिसंवर्धित दर्जेदार रोपांचा अभाव, वेळेवर लागवड करता न येणे, बेणेप्रक्रियाचा अभाव, शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापनचा अभाव, कंदमाशीचे व्यवस्थापन, कुशल मजुरांची कमतरता, काढणीपश्चात प्रक्रियेचाअभाव या नेहमीच्या अडचणी आहेत. तरीही बाजारपेठ मोठी आहे. जिल्यात हळद प्रक्रियेचे २० संच उभे असून त्याची क्षमता ४२ क्विंटल प्रतिदिनपासून ते २८० क्विंटल प्रति दिवस एवढी आहे. हिंगोली व वसमत येथे लिलाव पद्धतीने शेतकरी अडत व्यापाऱ्यांमार्फत सुकलेल्या हळदीची विक्री करतात. पण उत्पादन वाढीसाठी हळद संशोधनाची मोठी गरज आहे. विशेषत: कंदमाशी व करपा या कीडरोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधनाची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत हळदीचे संशोधन चालू आहे. सेलम, कृष्णा, कराडी, टेकूरपेटा, फुले स्वरूपा, रोमा, कडपा, सुगंधा, सुवर्णा, वायगाव, सोनिया, प्रतिभा, पीकेव्ही वायगाव या हळदीच्या वाणांवर प्रयोग घेण्यात आले आहेत. हळदीमध्ये कुरकुमिन या घटकाचे प्रमाण जास्त प्रमाण असलेल्या वाणांवर प्रयोग सुरू आहेत. खत व पाणी व्यवस्थापन यावर संशोधन चालू आहे. विभागीय कृषी सल्लागार समितीकडून त्याचा निष्कर्ष येणे बाकी आहे. ६५ शेतकरी उत्पादन गट स्थापन करण्यात आले असून त्यांच्यामार्फत सध्या हळद उत्पादनाचे काम चालू आहेत.

 निर्यात केंद्राना प्रोत्साहन

  हळदीवर प्रक्रिया करून हळद पावडर स्वरूपात योग्य पॅकिंगमध्ये विपणन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. प्रक्रिया सोलर ड्रायर पॉलीशर, ग्रेडर, प्रक्रिया, बोर्डिंग, निर्यातीची गरज आहे जिल्यातील शिरडशहापूर तालुका औंढा येथून हळदीचा कोचा निर्यात केला जातो अशा प्रकारच्या निर्यात केंद्रांना प्रोत्साहन देऊन त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करणे गरजेचे आहे. 

उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चिातच मदत होईल असे जिल्हा कृषी अधीक्षक एस. ए. घोरपडे यांनी  सांगितले.

हळद बेनेची गरज व प्रत्यक्ष उपलब्ध

जिल्ह्यात हळद बेनेची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता ८० हजार मेट्रिक टन आहे. परभणीच्या कृषी विद्यापीठातून उपलब्ध होणारे बेणे १.१० मेट्रिक टन, प्रगतशील शेतकऱ्याकडून ७३ हजार९०० मेट्रिक टन, निविष्ठा पुरवठादारमार्फत पाच हजार मेट्रिक टन, तर सांगली जिल्ह्यातूनही गरजेप्रमाणे उपलब्ध केले जाते.

प्रक्रिया युनिटची गरज

जिल्ह्यात २० संच उपलब्ध आहेत. त्याची क्षमता ७२० मेट्रिक टन प्रतिवर्षी एवढी आहे. उत्पादित होणाऱ्या वाळलेल्या हळदीपैकी फक्त तीन टक्के हळदीवर प्रक्रिया केली जाते. हे प्रमाण दहा टक्केपर्यंत वाढवायचे असेल तर एक हजार १८४ युनिटची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १८०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उपलब्ध आहेत. त्यामध्ये २५० मेट्रिक टन हळद साठविण्यात आलेली असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे या संदर्भात एक नियोजित आराखडा कृषी विभागामार्फत पाठवून देण्यात आला आहे. तसेच यासाठी आवश्यक जमिनीसंदर्भात माहिती पाठवली आहे. हळदीच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होऊन उत्पादन वाढ होणार आहे. सदर प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. – जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी हिंगोली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Plan to speed up the turmeric research process in hingoli akp

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या