कराड : सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये येत्या ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी दिली.

भाजपच्या बाराव्या यादीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काहीशी उशिरा पण, उदयनराजेंच्या प्रचाराने गती घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर, उदयनराजेंच्या प्रचारार्थ कराड येथे येत्या ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेत तोफ धडाडणार असल्याने भाजपसह महायुतीत चैतन्य दिसू लागले आहे.

हेही वाचा – “आता कुठे आहेत ते?”, शरद पवारांचा विखे पाटलांबाबत खोचक सवाल; म्हणाले, “त्यांचा पराक्रम…”

सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी आज शुक्रवारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोअर कमिटीचे बैठक घेतली. भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कराड दक्षिण भाजप कोअर कमिटीतील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – “माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…”, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडेंना इशारा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्मलकुमार सुराणा यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच या अनुषंगाने कोअर कमिटी पदाधिकारी, सदस्यांना काही सूचना केल्या. त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अर्थात ‘महायुती’चे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी कराड शहरात दोन ठिकाणी जागेची पाहणीही केली आहे. त्यातील कराड लगतच्या सैदापूर येथील ३५ एकर जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. परंतु, जागेसंदर्भातील अधिकृत माहिती भाजपच्या नियोजन बैठकीनंतर देण्यात येणार असल्याचे एकनाथ बागडी यांनी स्पष्ट केले आहे.