सांगली : खूनप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना चकवा दिला. मात्र, ही फुशारकी मारण्याच्या नादात एक फोन केला आणि हा संपर्कच पुन्हा त्याला कोठडीच्या दिशेने घेऊन जाणारा ठरला.
इस्लामपूरमध्ये ३ जून रोजी हानिफाबी मुल्ला (वय ६५) या महिलेचा खून करून दागिने लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी संशयिताने कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची दक्षताही घेतली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी मुवाज ईलाई मुलाणी (रा. इदगाहनगर, इस्लामपूर) याला अटक केली. न्यायालयाने त्याला आजअखेर (७ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. तथापि, वैद्यकीय कारणासाठी त्याची विनंती मान्य करत त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. यानुसार शुक्रवार, दि. ६ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सांगलीत मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी पोलिसांनी आणले होते.
या दरम्यान त्याच्या हाती बेडी होती. एक पोलीस कर्मचारी त्याच्यासाठी औषधे व खाद्य आणण्यासाठी गेला असताना दुसऱ्या पोलिसाच्या हाती बेडीची दोरी होती. अंगलट बारीक असल्याने त्याने हातातील बेडी काढून धूम ठोकली. यामुळे कारागृह परिसरासह पोलिसांत खळबळ माजली. इस्लामपूर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. पलायनानंतर त्याने इस्लामपूरमधील एका ओळखीच्या व्यक्तीला अनोळखी व्यक्तीकडून घेतलेल्या मोबाइलवरून संपर्क साधला. याच आधारे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागला आणि मिरज रेल्वे स्थानकावर पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीच्या हाती पुन्हा बेड्या पडल्या.