जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून उपोषण सुरू होतं. पण, उपोषण मागे घेण्यासाठी आंदोलकांवर प्रशासनाकडून दबाव वाढवण्यात आला. तेव्हा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहेत. त्यातूनच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

नेमकं प्रकरण काय?

२९ ऑगस्टपासून मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण कार्यकर्तेही सराटी गावात उपस्थित होते. पण, उपोषकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद निर्माण झाला.

यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांसह गावकरीही जखमी झाले आहेत.

याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार ‘टीव्ही ९ मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. “लाठीचार्ज कोणत्या कारणाने झाला, याची मला माहिती नाही. लाठीचार्ज का करण्यात आला? याचा खुलासा सरकार आणि पोलिसांकडून घेतला जाईल,” असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणारं सरकार आम्हाला नको, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटल्याबाबत मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, “अशी घटना झाली की त्यांचं खातेवाटप सुरू होतं. त्यांच्याकडं फार गंभीरतेने पाहू नये. सरकार थोडीच लाठीचार्जचे आदेश देते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तहसीलदार किंवा अधिकारी उपोषणाच्या ठिकाणी जातात. पण, उपोषणकर्त्यांचं आग्रह एका विशिष्ट अधिकारी किंवा व्यक्तीबद्दल असतो. तेव्हा असे प्रश्न निर्माण होतात,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.