सोलापूर : शहराच्या मध्यवस्तीत एका हॉटेलात उतरलेल्या एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटे (वय ७०) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले संबंधित हॉटेल सपाटे याच्या मालकीचे आहे. त्यांच्याच हॉटेलमध्ये उतरलेल्या पीडित महिलेने यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सपाटेविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संबंधित पीडित महिला (वय ४५) पुण्यातील राहणारी असून तिचे मूळ गाव उत्तर सोलापूर तालुक्यातील आहे. गावातील स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीचा वाद सोलापुरात न्यायालयात सुरू आहे. याच्या दाव्यासाठी पीडित महिला सोलापुरात आली होती. सपाटे याने संबंधित महिलेची ओळख करून घेतल्यानंतर मध्यरात्रीनंतर पीडित महिलेच्या खोलीचा बंद दरवाजा ठोठावला. खोली उघडताच त्याने पीडित महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असलेल्या सपाटे याच्याविरुध्द यापूर्वीही विनयभंग आणि लैंगिक शोषणाचे काही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यासंदर्भात सपाटे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.