जनतेच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असणा-या पोलीस कर्मचा-यालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. हिंजवडीमधील पोलीस शिपाई मोहन गोविंदा दळवी (२९) या पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश सूर्यकांत साखरे याने गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात मोहन गोविंदा दळवी यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी हिंजवडी मधील हॉटेल सनराईज येथे भांडण सुरू असल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानुसार पोलीस शिपाई मोहन दळवी आपल्या सहका-यांसोबत तिथे पोहोचले. यावेळी उमेश साखरे याने ‘तू इथे कशाला आला आहेस तुम्हाला गोळ्या घालीन’ अशी धमकी देत धक्का दिला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर साथीदार शरद तुकाराम हुलावळे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केलं असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.