हिंगोली: अंगणवाडी मदतनीस कर्मचाऱ्याचा रुजू करून घेतल्यानंतर तसा अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंग चव्हाण यास अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

हिंगोली येथील बालकल्याण विकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस पद भरतीसाठी जागा निघाल्या होत्या. या पदासाठी तक्रारदारांच्या पत्नीने अर्ज केला होता. त्यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंग बजरंगसिंग चव्हाण याने मदतनीस म्हणून निवड करण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये त्याने घेतले होते. त्यानंतर १८ जुलै २०२५ रोजी तक्रारदाराच्या पत्नीची अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड झाली. मदतनीस यांचा रुजू अहवाल देण्यासाठी चव्हाण याने तक्रारदाराकडे राहिलेल्या ३० हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात ६ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्या आधारे सापळा रचून विशालसिंग बजरंगसिंग चव्हाण यास अटक करण्यात आली.