अहिल्यानगर : स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून, राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध केलेला ४०० गोण्या जुना तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेडमधून जप्त केला.यासंदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४०० गोण्या तांदूळ व मालमोटर असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जामखेड ते करमाळा रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

मालमोटरचालक सुंदर बबन घुमरे (६०, लोणी, जामखेड) याने या तांदळाच्या गोण्या योगेश मोहन भंडारी (रा. जामखेड) याच्या दुकानातून घेतल्याची कबुली दिली. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थाद्वारे उपलब्ध करण्यात आला होता व सांगली येथे काळ्या बाजारात त्याची विक्री केली जाणार होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच लाख रुपये किमतीच्या तांदळाच्या ४०० गोण्या व २५ लाख रुपयांची मालमोटार (एम एच १७ बीडी ८१०२) जप्त करण्यात आली आहे. जामखेड पोलीस ठाण्यात सुंदर घुमरे व योगेश भंडारी या दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार विश्वास बेरड, वीरप्पा करमल, हृदय घोडके, रोहित मिसाळ, भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.