महिना उलटूनही बदली कर्मचारी पाठविले नाहीत. या काळात प्रत्येकाचे सात ते आठ हजार रुपये खर्च झाले, पण अनेकांना आगाऊ रक्कमही अद्याप मिळालेली नाही. घरी जाता येईल याकरिता साप्ताहिक सुटीला जोडून एका दिवसाची रजा दिली जात नाही. परिणामी घर खर्च व तत्सम पैसे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे वा त्यांची भेटही अवघड बनली आहे..
ही व्यथा आहे, बंदोबस्तासाठी सिंहस्थ नगरीत दाखल झालेल्या राज्यभरातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची. या प्रकाराने शाही पर्वणीच्या मुख्य बंदोबस्ताआधीच मानसिक ताण आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी शासनाने इतर जिल्ह्यातून तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळाची उपलब्धता करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत शासकीयविभागांनी गरजेनुसार १३ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीसाठी हे मनुष्यबळ उपलब्ध करावे, असे सूचित करण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या पोलीस यंत्रणेला सर्वाधिक मनुष्यबळ लागले आहे. केवळ नाशिकचा विचार करता तब्बल १५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला जात असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. शाही पर्वणीत कोटय़वधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज असल्याने सुरक्षिततेसोबत गर्दीच्या व्यवस्थापनाचे आव्हान आहे. गेल्या महिन्यात पुरोहित संघाच्या ध्वजारोहणावेळी ठाणे, धुळे, पुणे व इतर अनेक जिल्ह्यांतून कुमक मागविण्यात आली. सिंहस्थ बंदोबस्ताचा आदेश हाती सोपविताना महिनाभरात बदली कर्मचारी पाठविला जाईल, असे सांगितले गेले. म्हणजे प्रत्येकाला महिनाभर या ठिकाणी काम करावे लागेल अशी अपेक्षा होती. मुख्यालय वा पोलीस ठाण्यातून परजिल्ह्यात जाताना पाच हजाराची आगाऊ रक्कम दिली जाते. ही रक्कम अनेकांना दिली गेली नाही. महिना संपुष्टात येऊनही मुख्यालयांनी बदली कर्मचारी पाठविले नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.
बाहेरगावहून आलेले कर्मचारी साधुग्रामसह इतरत्र तैनात आहेत. त्यांची निवास व्यवस्था पोलीस मुख्यालयासह वेगवेगळ्या मंगल कार्यालयात केली जात आहे. भोजन व तत्सम कामांसाठी दररोज त्यांना पदरमोड करावी लागते. नियमित वेतन बँक खात्यात जमा झाले. पण आगाऊ रक्कम जमा झाली नाही. साप्ताहिक सुटी मिळते. मात्र, चोवीस तासात परजिल्ह्यातील घरी जाऊन परतणे अवघड आहे. यामुळे सुटीला जोडून काहींनी एक-दोन दिवसांची रजा मागितली.
मात्र ती मंजूर होत नसल्याने कर्मचारी त्रस्तावले आहेत. परगावच्या अधिकारी वर्गाला रजा दिली जाते. मात्र शिपाई, हवालदार व पोलीस नाईकांना ती दिली जात नसल्याचा सूर आहे. सिंहस्थात अहोरात्र सज्ज राहावे लागत असल्याने पोलिसांवर कामांचा प्रचंड ताण आहे. त्यात आर्थिक कुचंबणा व कौटुंबिक कारणास्तव ते अस्वस्थ झाले आहेत.

रजा देण्यास कोणतीही अडचण नाही
बाहेरील जिल्ह्यतून आलेले पोलीस अधिकारी वा कर्मचारी यांना रजा देण्यात कोणतीही अडचण नाही. किंबहुना प्रत्येकाची गरज लक्षात घेऊन सर्वाना त्या दिल्याही जात आहेत. पोलीस प्रशासनाला १८ ऑगस्टपर्यंत सुटी देण्यात अडचण नाही. ज्यांना आगाऊ रक्कम मिळाली नाही, त्यांना पोलीस कल्याण निधीतून रक्कम उपलब्ध केली जाईल. – एस. जगन्नाथन (पोलीस आयुक्त, नाशिक)