अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी हुकल्याने, नाराज असलेल्या रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले. यावेळी स्थानिक नागरीक, विद्यार्थी आणि मोजके पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेच्या विरोधानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असली तरी, पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार आणि संधी आदिती तटकरे यांच्याच वाट्याला जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्याचा मानही आदिती तटकरे यांना देण्यात आला, त्यामुळे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले नाराज झाले होते. याच नाराजीतून ते नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहील्याची चर्चा होती.

शुक्रवारी स्वातंत्र दिनाचा मुख्य ध्वजवंदन सोहळा अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पार पडला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजवंदन केले. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि जिल्ह्यातील इतर आमदार या सोहळ्यापासून दूर राहीले.

ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या रत गोगावले त्यांच्या बिरवाडी गावातील ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले. मोजक्या लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रायगड जिल्ह्यात प्रजास्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहण करण्याचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. स्वातंत्र्य दिन सोहळ्याला हा मान आपल्याला मिळावा यासाठी गोगावले आणि शिवसेना आमदार आग्रही होते. मात्र शिवसेना आमदारांची मागणी आणि गोगावले इच्छा डावलून पून्हा एकदा आदिती तटकरे यांनाच रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाची संधी देण्यात आली होती. अखेर नाराज असलेल्या गोगावले यांनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीतच ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला.