Political News in Today : राज्यातील जवळपास सर्वच भागात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लोकांच्या पिकांचं नुकसान पाहून सरकारने या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक करत आहेत. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. यातच दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेबाबत खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत महत्वाचं विधान केलं आहे. तसेच भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुणे विद्यापीठाबाबत केलेल्या एका विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसेच ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी क्रिकेट सामन्यावरून एक महत्वाचं विधान करत सरकारला जाब विचारला आहे. दरम्यान, दिवसभरातील पाच राजकीय नेत्यांनी केलेल्या विधानाबाबतच्या घडामोडी जाणून घेऊयात.
‘उद्धव ठाकरे-राज ठाकरेंमध्ये वैचारिक आदानप्रदान होऊ शकते’
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. राऊत म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत चांगली चर्चा आहे. हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक विषयांवर ते चर्चा करत आहेत. एकमेकांशी संवाद साधत आहेत. विचारांची देवाणघेवाण करत आहेत. दसरा मेळाव्यात वैचारिक आदानप्रदान होऊ शकते”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही’
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने होत आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की आपण शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना सर्व सवलती देऊ. कारण नियमांमध्ये ओला दुष्काळ असं काहीच नाहीये. आजवर कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही निर्णय घेतला आहे की दुष्काळ पडतो तेव्हा ज्या उपाययोजना राबवल्या जातात, तेव्हा ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती यावेळी देखील देणार आहोत. राज्यात दुष्काळामुळे टंचाई निर्माण झाली आहे असं समजून सर्व सवलती लागू करत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा तसाच अर्थ असतो.”
नितीन गडकरींनी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत काय विधान केलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मागील काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. यावर आता मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देत उत्तर दिलं आहे. “मी एकाही कंत्राटदाराकडून कधी एक रुपयाही घेतला नाही. माझ्यावर लोकाचा विश्वास आहे, मी कुठल्याही प्रकारची खोटी कामे केली नाहीत. कुणी कितीही आरोप केले, तरी मी विचलित होणार नाही. जनतेला सत्य माहिती आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
‘आंदोलने नाही, सरकारची धोरणेच जबाबदार’ : चंद्रकांत पाटील
सततच्या आंदोलनांमुळे विद्यापीठाची चुकीची प्रतिमा निर्माण होऊन राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाली असल्याचं विधान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विद्यार्थी चळवळीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘हुतात्म्यांची तुलना क्रिकेट सामन्याबरोबर कशी?’ : ओवेसी
एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरून सरकारवर टीका केली आहे. ओवेसी पुण्यात बोलताना म्हणाले की, ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले. त्या देशाबरोबरचा व्यापार थांबवला. पण, दुसरीकडे पाकिस्तान विरोधात क्रिकेट सामना खेळला. पाकिस्तान विरोधात खेळण्यास नकार दिला असता, तर पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. भारताच्या सामन्यातील विजयानंतर पंतप्रधान या विजयाला ‘ऑपरेशन सिंदूर-३’ असे संबोधतात. मात्र, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमधील हुतात्म्यांची तुलना क्रिकेट सामन्याबरोबर कशी होऊ शकते,’ असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.