कोणता विषय कधी कसे वळण घेईल आणि त्यातून कसे राजकारण होईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई-लातूर या गाडीचा प्रवास कर्नाटकातील बीदपर्यंत वाढविण्याच्या रेल्वे खात्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद. यात राजकारण्यांनी तर उडी घेतलीच, पण बंद, आंदोलनही सुरू झाले. या वादापायी अस्मितेचा मुद्दा पुढे करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे ही माणसे जोडण्याचे काम करते असा दावा रेल्वे प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात रेल्वे विस्तारीकरणामुळे माणसे तोडण्याचे काम होते आहे. बीदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी मुंबईहून लातूरला येणारी लातूर एक्स्प्रेस सकाळी ७ पासून रात्री साडेदहापर्यंत लातूरच्या यार्डात नुसती उभी असते म्हणून ही गाडी बीदपर्यंत वाढविण्याची मागणी केली. यापूर्वी ही रेल्वे कधी पंढरपूपर्यंत तर कधी नांदेडपर्यंत चालवण्याचे प्रयोग झाले, मात्र त्यात यश न आल्यामुळे रेल्वे लातूरच्या यार्डात उभी ठेवावी लागते. लातूरची रेल्वे बीदपर्यंत नेण्यासाठी खासदार खुब्बा यांनी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. दहा दिवसांपूर्वी प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर आठवडय़ातील तीन दिवस लातूरची रेल्वे बीदपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे जिल्हय़ातील उदगीर, देवणी, जळकोट, चाकूर, अहमदपूर या पाच तालुक्यांनी स्वागत केले, मात्र लातूरकरांनी याला तीव्र विरोध केला.

प्रारंभी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी विस्तारीकरणाला विरोध केला तर भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी उदगीर, बीदर ही गावे पाकिस्तानात आहेत का, असा सवाल करत विस्तारीकरणास पािठबा दिला. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी या विस्तारीकरणाला विरोध दर्शविला. लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव संघर्ष समिती स्थापन करून या समितीच्या वतीने आंदोलन छेडत सहय़ांची मोहीम, लातूर बंद व रेल रोको आदी कार्यक्रम करण्यात आले. लातूरला पहिल्यांदाच उस्मानाबादकरांनी साथ देत रेल्वे विस्तारीकरणाला विरोध करीत उस्मानाबादकरांनीही बंद पाळला. जिल्हय़ातील उदगीर तालुक्यात या रेल्वे विस्तारीकरणाचे जोरदार स्वागत झाले. विस्तारीकरणाला विरोध करण्याच्या विरोधात उदगीरमध्ये बंद पाळण्यात आला. खासदार सुनील गायकवाड यांच्या मतदारसंघात दोन्ही गावे येत असल्यामुळे त्यांची साहजिकच अडचण झाली. उदगीरकरांसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करू मात्र लातूर एक्स्प्रेस ही लातूपर्यंतच ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली. कारण लातुरात गायकवाड यांचा पुतळा आंदोलकांनी जाळला होता. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत जाऊन सोमवारी भेट घेतली. त्यांच्या भेटीपूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आठवडय़ातील तीन दिवस लातूर एक्स्प्रेस बीदरला जात आहे, तर उर्वरित चार दिवस ती परळीपर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बीदरहून मुंबईसाठी अतिरिक्त रेल्वे १ जुलपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय बेंगलोरहून बीदपर्यंत येणारी यशवंतपूर एक्स्प्रेस लातूपर्यंत वाढवण्याचेही आश्वासन दिले. त्यातून लातूरकरांना दररोज बेंगलोरला जाता येणार आहे. शिवाय बीदर-मुंबई या नव्या रेल्वेमुळे प्रवाशांची सोय होईल. उस्मानाबाद, बीदर व लातूर या तीन शहरांसाठी समान आरक्षित जागा राहतील, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले

आहे. बीदपर्यंत गाडीच्या विस्तारीकरणामुळे खरी अडचण झाली आहे ती सर्वसाधारण डब्यात प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांची. कमी पशात, कमी वेळेत मुंबईला जाण्याची सोय प्रवाशांची होत होती. विस्तारीकरणाच्या निर्णयानंतर दोन सर्वसाधारण डबे काढून त्याऐवजी दोन शयनयान कक्ष वाढवण्यात आले. बीदर, उदगीरहून येणारे प्रवासीच रेल्वेत खचाखच भरल्यामुळे लातूरहून बसणाऱ्या सामान्य प्रवाशांची गरसोय होत आहे. या प्रवाशांची सोय होणे हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे.

अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या प्रयत्नामुळे लातूर एक्स्प्रेस सुरू झाली होती. या रेल्वेला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला. ही गाडी नेहमीच खचाखच भरून जाते. रेल्वेला प्रवाशांतून अ दर्जाचे व मालवाहतुकीतूनही अ दर्जाचेच उत्पन्न मिळते, मात्र अशा शहराला रेल्वे प्रशासन क दर्जाची वागणूक देते आहे. त्यामुळेच रेल्वे प्रवाशांत खरा असंतोष आहे.

सामान्य प्रवाशांची गरसोय दूर व्हावी याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. याऐवजी हा प्रश्न अस्मितेचा झाला तर निवडणुकीत फटका बसेल अशी भीती भाजपच्या मंडळींच्या मनात आहे, तर हा प्रश्न अस्मितेचा केला तर निवडणुकीत याचा आपल्याला लाभ मिळेल, असे काँग्रेससह सर्व विरोधकांचे मत आहे. बीदरचे भाजपचे खासदार भगवंत खुब्बा यांनी रेल्वे प्रश्नाच्या वादात थेट लातूरमध्ये येऊन सोमवारी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस केले. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या राजकारणासाठी मी विस्तारीकरणाचा पाठपुरावा केला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीदर व लातूर या दोन शहरांचे ऋणानुबंध आहेत. ते रेल्वेमुळे दृढ होतील यासाठी आपण विस्तारीकरणाचा पाठपुरावा केल्याचा दावा केला.

रेल्वे विस्तारीकरणाच्या नादात सामान्य माणसांचे प्रश्न हरवून जाऊन त्यात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकारणी प्रश्न पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वादातून राजकीय लाभ होईल की नाही माहिती नाही, मात्र सामान्यांचे प्रश्न हवेतच विरून जातात याचा प्रत्यय पुन्हा एकदा येणार आहे.

  • बीदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी मुंबईहून लातूरला येणारी लातूर एक्स्प्रेस सकाळी ७ पासून रात्री साडेदहापर्यंत लातूरच्या यार्डात नुसती उभी असते म्हणून ही गाडी बीदपर्यंत वाढविण्याची मागणी केली.
  • लातूरची रेल्वे बीदपर्यंत नेण्यासाठी खासदार खुब्बा यांनी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. दहा दिवसांपूर्वी प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर आठवडय़ातील तीन दिवस लातूरची रेल्वे बीदपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे जिल्हय़ातील उदगीर, देवणी, जळकोट, चाकूर, अहमदपूर या पाच तालुक्यांनी स्वागत केले, मात्र लातूरकरांनी याला तीव्र विरोध केला.
  • प्रारंभी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी विस्तारीकरणाला विरोध केला तर भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी उदगीर, बीदर ही गावे पाकिस्तानात आहेत का, असा सवाल करत विस्तारीकरणास पािठबा दिला. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी या विस्तारीकरणाला विरोध दर्शविला.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics on latur bidar mumbai new railway
First published on: 10-05-2017 at 02:52 IST