गोकूळ दूध संस्थेतील गैरव्यवहाराची चर्चा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर होऊ लागली असताना दुसरीकडे या संस्थेने पाणी प्रदूषित केल्याच्या कारणावरून पाच लाख रुपयांची बँक हमी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने रद्द केली आहे. हा संस्थेला बसलेला मोठा झटका मानला जात असून त्याचे निवडणुकीत भांडवल बनण्याची चिन्हे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रदूषणविषयक अटींचे उल्लंघन केल्यामुळे विभागीय अधिकारी सूर्यकांत डोके यांनी गोकूळची बँक हमी जप्त करण्याची सूचना रत्नाकर बँकेला केली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा (गोकूळ) गोकूळशिरगाव येथे मुख्य प्रकल्प आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी शेतीसाठी नेर्ली गावच्या ओढय़ामध्ये थेट सोडले जाते. काही शेतकऱ्यांकडून त्याचा वापर होतो, पण काहींनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रदूषित पाण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मंडळाच्या अधिकाऱ्याने याची माहिती घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून गोकूळवर कारवाई केली आहे.
गोकूळने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बँक गॅरंटी म्हणून पाच लाख रुपये शाहूपुरीतील रत्नाकर बँकेत जमा केले होते. ही बँक हमी रद्द करण्याविषयी मंडळाने बँकेला पत्र दिले होते. नेर्ली-तामगाव येथील ओढय़ात गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतून प्रदूषित पाणी सोडल्याच्या तक्रारी यापूर्वीही अनेक वेळा मंडळाकडे आल्या होत्या, पण गोकूळच्या विरोधात आजपर्यंत कधीच कारवाई झाली नव्हती. बँक हमी जप्त करण्याचे बँकेला पत्र दिल्याचे समजताच गोकूळच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबविण्यासाठी लगेचच पळापळ सुरू केल्याचे सांगण्यात आले. मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, पण अधिकारी कारवाईवर ठाम राहिल्याने बँक हमी जप्त करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
गोकूळ प्रकल्पातून प्रदूषित पाणी थेट नाल्यात सोडल्याने या परिसरातील शेतीवर अनिष्ट परिणाम होत आहे. विहिरीतील पाणीही प्रदूषित होत असल्याने व नाल्याचे पाणी थेट नदीत जात असल्याने पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. विभागीय आयुक्त चोक्किलगम यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी आडकाठी आणणाऱ्यांवर फौजदारी करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्र्वभूमीवर गोकूळवर बँक हमी रद्द करण्याची कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘गोकूळ’ची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रद्द
गोकूळ दूध संस्थेतील गरव्यवहाराची चर्चा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होऊ लागली असताना दुसरीकडे या संस्थेने पाणी प्रदूषित केल्याच्या कारणावरून पाच लाख रुपयांची बँक हमी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने रद्द केली आहे.

First published on: 15-01-2015 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution control board canceled bank guarantee of gokul