पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप झाले आहेत. पूजाचे त्यांच्यासोबत संबंध होते, असं देखील म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पूजा चव्हाणच्या वडिलांची एक भावनिक प्रतिक्रिया आली असून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे. ‘सध्या पूजाची चाललेली बदनामी थांबली नाही, तर मला कुटुंबासोबत आत्महत्याच करावी लागेल’, अशा शब्दांत पूजाच्या वडिलांनी एबीपीशी बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच, पूजाच्या संपूर्ण कुटुंबाने ही बदनामी त्वरीत थांबवावी अशी मागणी केली आहे.

“पुरावे नसताना फोटो जोडून बदनामी का”

“आम्ही कसंतरी सावरत आहोत. एकेक दिवस मागे टाकत आहोत. तेवढ्यात नवीन काहीतरी टीव्हीवर दाखवतात. नवीन फोटो जुळवतात. माझी मुलगी राजकीय कार्यकर्ती होती हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांचं काम करत होती. तिचे कितीतरी फोटो आहेत. मग एकाच व्यक्तीसोबत का फोटो दाखवले जातात? पुरावे नसताना फक्त फोटो जोडून बदनामी केली जात आहे. तिला न्याय मिळायलाच हवा. माझी एक मुलगी गेली. पण हे दाखवत आहेत, ते पाहून माझ्या दुसऱ्या मुलीशी कोण लग्न करेल? माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर मुलीसोबत कोर्टासमोर जाऊन आत्महत्या करायची किंवा या सगळ्यांबद्दल न्यायालयात केस दाखल करायची”, असं पूजा चव्हाणचे वडील म्हणाले आहेत.

पूजा राठोड म्हणजेच पूजा चव्हाण?

“माझ्या आई-वडिलांना काही झालं तर…”

दरम्यान, या मुद्द्यावर पूजाच्या लहान बहिणीने देखील परखड प्रतिक्रिया दिली आहे. “या बदनामीमुळे माझ्या आई-वडिलांना काही झालं, तर तुम्ही माझं पालन-पोषण करणार आहात का? माझी जबाबदारी तुम्ही घेणार का?” असा सवाल पूजाची बहीण दियाने केला आहे. “पूजा ११वीपासून राजकारणात आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासोबत तिने काढलेले फोटो व्हायरल का होत नाहीत? त्या पुरूष नाहीत म्हणून का?” असाही प्रश्न दियाने विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Pooja Chavan Case : “पोलिसांनी ‘तो’ फोनकॉल जाहीर करावा”, चित्रा वाघ यांनी दिलं आव्हान!