सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा निषेध करण्यासाठी आज ठाकरे सेनेच्या वतीने सिंधुदुर्ग – हुमरमळा येथे “चक्का जाम” आंदोलन करण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पोलिसांनी नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

​सकाळी सिंधुदुर्ग – हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत महाविद्यालयासमोर, राणे स्टॉप येथे मोठ्या संख्येने ठाकरे सेनेचे कार्यकर्ते जमले होते. महामार्गाच्या कामाला होणारा विलंब आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावर व्यासपीठावरून जोरदार टीका करण्यात आली. माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, युवक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

​यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “महामार्गाचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जातो, पण अनेक उड्डाणपूल आणि पुलांची कामे अजूनही बाकी आहेत. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.” त्यांनी महामार्गाची त्वरित दुरुस्ती न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

आंदोलनादरम्यान, कार्यकर्त्यांनी महामार्गावर घोषणाबाजी केली. कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी महामार्गाच्या दुरावस्थेचा निषेध म्हणून दुधाचा अभिषेक केला, तर महिला कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून शासनाचा निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी महामार्ग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्टपूर्वी महामार्गाची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पोलिसांनी वैभव नाईक यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

दरम्यान सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांची भ्रमणध्वनीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवून आणली. येत्या तीन महिन्यांत कामात चांगली प्रगती झालेली दिसेल असे आश्वासन गडकरी यांनी दिले. यावेळी आमदार दिपक केसरकर हेही
उपस्थित होते.