अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण तालुका व परिसर गणेशमूर्ती निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखला जातो. दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार करणाऱ्या या परिसरातील मूर्तिकारांपुढे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवरील बंदीचे ‘विघ्न’ आले आहे. पीओपी मूर्तींबाबत संभ्रम कायम असल्याने तयार झालेल्या लाखो गणेशमूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

पेण तालुक्यात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. पेण शहर आणि हमरापूर जोहे परिसरात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या साडेपाचशेहून अधिक कार्यशाळा आहेत. ज्यामधून दरवर्षी ३५ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या गणेशमूर्ती राज्यासह देश-विदेशात पाठवल्या जातात. दरवर्षी या व्यवसायातून ७५ ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. या व्यवसायामुळे २७ हजार जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. राज्यात लागणाऱ्या एकूण गणेशमूर्तींपैकी जवळपास ५५ टक्के गणेशमूर्ती पेण तालुक्यात तयार केल्या जातात. अनंत चतुर्दशीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी पेणमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. हे काम वर्षभर सुरू असते. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. हमरापूर जोहे परिसरात काही लाख पीओपीच्या गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. त्यांचे रंगकाम आणि आखणी शिल्लक आहेत. मात्र पीओपी मूर्तीवरील बंदीमुळे आता तयार झालेल्या गणेशमूर्तींचे करायचे काय हा प्रश्न मूर्तिकारांना भेडसावत आहे.

शासनाने पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी हटवायला हवी. आज पेण आणि हमरापूर परिसरात पीओपीच्या १० लाख कच्च्या आणि पाच लाख रंगकाम झालेल्या गणेशमूर्ती तयार आहेत. या मूर्तींचे करायचे काय हा प्रश्न आमच्यासमोर आहे. अनेकांनी कर्ज काढून या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. मूर्तींबाबत तातडीने निर्णय व्हायला हवा. – नीलेश समेळ, मूर्तिकार, पेण

आपल्या राज्यात पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घातली गेली, पण शेजारी असलेल्या गुजरात आणि आंध्र प्रदेश यांसह इतर राज्यात पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी नाही. मग पीओपीचे प्रदूषण फक्त महाराष्ट्रातच होते का? बंदीबाबतचा निर्णय अभ्यास करून घेतला गेलेला नाही. त्यामुळे आम्हीही याबाबत न्यायालयातही दाद मागणार आहोत. – कुणाल पाटील, मूर्तिकार, हमरापूर

पीओपी गणेशमूर्तीसाठी मूर्तिकार आग्रही का?

● पीओपीच्या गणेशमूर्ती टिकाऊ आणि वजनाला हलक्या असतात. कमी वेळात अधिक मूर्ती तयार करणे सहज शक्य होते. वाहतुकीसाठी पीओपीच्या गणेशमूर्ती उपयुक्त ठरतात.

● मूर्तीची सुबकता चांगली असते. किमतीलाही या मूर्ती शाडूच्या गणेशमूर्तींच्या तुलनेत स्वस्त पडतात. मातीच्या गणेशमूर्ती वजनाला जड, हाताळायला नाजूक आणि बनवायला अधिक परिश्रमाच्या असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● मूर्ती घडवण्यासाठी लागणारा वेळही जास्त असतो. त्यामुळे मूर्तिकार पीओपी गणेशमूर्तीसाठी आग्रही आहेत.