भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा धर्मिकतेकडे झुकलेले नेते आहेत. त्यांचे सध्याचे वर्तन हे ‘आरएसएस’च्या पंगतीत बसणारे असल्याची टीका भारिपचे अध्यक्ष अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, निवडणूक समझोत्यासाठी मला दहा-दहा वेळा संपर्क साधणाऱ्या काँग्रेसने आता ठरवावे की आमच्यासोबत त्यांना यायचे आहे की नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी या वेळी काँग्रेसवर केली.

आंबेडकर म्हणाले, की काँग्रेसचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी वरवर धर्मनिरपेक्ष चेहरा दाखवत असले, तरी ते सुद्धा धर्मिकतेकडे झुकलेले नेते आहेत. यामुळेच सध्या ते मठ-मंदिरे यांना भेटी देत सुटले आहेत. त्यांच्या आजोबा-वडिलांनी ही अशी दर्शने कधी घेतली नव्हती. त्यांचे हे वर्तन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंगतीतच बसणारे आहे.

दरम्यान, गेले अनेक दिवस काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही या चर्चेला पूर्णविराम देत आंबेडकर म्हणाले, की सध्या आम्ही नाही तर काँग्रेस आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तर सुशीलकुमार शिंदे सारखा काँग्रेस नेता आपणास दहा दहा वेळा निरोप देत विनंती करतो आहे. पण आता आमच्या सोबत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे. आम्ही लोकसभेच्या सगळ्या जागा लढणार असून त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार असल्याचा इशाराही आंबेडकरांनी या वेळी दिला.

राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत आहे. त्यामुळे काँग्रेसला गरज वाटत असेल, तर त्यांनी आमच्याशी युती करावी. लोकसभेच्या अनेक जागांवर काँग्रेसकडे सध्या उमेदवार देखील नाहीत. त्या पक्षाची सध्याची अवस्था ही अशी आहे. दुसरीकडे आमच्याकडे ३७ जागांवर उमेदवार तयार आहेत. समझोता नाही झाला, तर आम्ही स्वतंत्र लढू, असा इशारा आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे.

दरम्यान, आमच्याशी आघाडी करायची असेल, तर काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करावा लागेल. राष्ट्रवादीसारख्या जातीय पक्षासोबत आम्ही जाण्याचा प्रश्नच नाही, असेही स्पष्ट करत आंबेडकर यांनी त्या पक्षावरही सडकून टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar attack on congress president rahul gandhi
First published on: 13-11-2018 at 02:48 IST