Vanchit Bahujan Aaghadi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाल्याचे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: पत्रकारपरिषद घेत जाहीर केले आहे. या युतीमुळे आता महाराष्ट्रामधील राजकीय हालचाली वाढत असल्याचे दिसत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील अन्य दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी अद्याप प्रकाश आंबेडकरांची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत स्थान मिळणार की नाही किंवा प्रकाश आंबेडकरांची याबाबत नेमकी काय भूमिका असणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांबाबत एक विधान केलं आहे. ज्यावरून आता नव्या राजकीय चर्चा सुरू आहेत.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच आहे. असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी मी मागे प्रयत्न केले होते, असंही अशोक चव्हाणांनी सांगितलं आहे. आता उद्धव ठाकरेंमुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येत असतील, तर त्यांचं स्वागतच असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं, “मागे मी प्रयत्न केला होता परंतु जमलं नाही. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नाना यश येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांचं जे काही मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. महाविकास आघाडीबाबत त्यांची चर्चा उद्धव ठाकरेंसोबत झालेलीच आहे. शरद पवारांनी खुलासा केलाच आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अद्याप या विषयावर काही भाष्य नाही. त्यामुळे ज्यावेळेस ते होईल, त्यावेळी ते समजायचं झालं म्हणून. अजूनही आमच्याशी किंवा राष्ट्रवादीशी या विषयावर भाष्यं किंबहूना महाविकास आघाडीमध्ये अद्यापही चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालं असं मी ऐकतोय, पण आम्ही जे दोन घटकपक्ष महाविकास आघाडीचे आहोत, त्यांच्यासोबत अद्यापही कुठलीही संवाद या विषयावर झालेला नाही.”
हेही वाचा – “राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो, पण …” शरद पवारांचं पत्रकारपरिषदेत विधान!
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना(ठाकरे गट) युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यात आज शरद पवारांनीही वंचित बहुजन आघाडीबाबत कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत विधान केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.