scorecardresearch

Vanchit Bahujan Aaghadi: “माझी युती शिवसेनेबरोबर, मला इतरांचं…” प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले!

“महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का?” यावरही उत्तर दिलं आहे; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत.

Parakash Aambedkar new 1
प्रकाश आंबेडकर (संग्रहित छायाचित्र)

Prakash Ambedkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाल्याचे मागील आठवड्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: पत्रकारपरिषद घेत जाहीर केले. या युतीमुळे आता महाराष्ट्रामधील राजकीय हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यात आज शरद पवारांनीही वंचित बहुजन आघाडीबाबत कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत विधान केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या घडामोडी एकीकडे सुरू असताना प्रकाश आंबेडकरांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.

शिवसेनेसोबत तुम्ही युती केल्यापासून मागील काही दिवसांपासून काही खटके उडताना दिसत आहेत, काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याकडे आपण कसं पाहता? या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी “प्रश्न तो नाही, प्रश्न असा आहे की माझी युती शिवसेनेबरोबरची आहे आणि ती कायम आहे. त्यामुळे मी तिथपर्यंतच मर्यादित आहे आणि मला इतराचं काही देणंघेणं नाही.” असं स्पष्ट सांगत आपली भूमिका मांडली.

हेही वाचा – “राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो, पण …” शरद पवारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

याशिवाय, “महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का? याप्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आबंडकरांनी सांगितलं की, “तो मुद्दा मी ज्यावेळी स्पष्ट करायचा तेव्हा मी करेन, आता मी काही त्यावर बोलत नाही.” असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. टीव्ही 9 शी ते बोलत होते.

हेही वाचा – “अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो, पण…” वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत शिवसेनेचे मोदी सरकारवर टीकास्त्र!

याचबरोबर संजय राऊतांकडून करण्यात आलेल्या टिप्पणीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मला जे बोलयाचं होतं ते मी बोललो आहे. माझ्या पक्षाने काय बोलवं हे माझा पक्ष ठरवतो. आमच्या दृष्टीने जे आम्हाला मांडायचं होतं, ते मांडून आमचं झालेलं आहे. पुढचा काळ जसा जाईल त्यानुसार आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत राहू.”

शरद पवार काय म्हणाले? –

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही.”, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी कोल्हापुरमधील पत्रकारपरिषदेत बोलताना मांडली.

हेही वाचा –  वंचितसोबतच्या आघाडीबाबत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “आम्ही त्याची चर्चा…”

प्रकाश आंबेडकर विरुद्ध संजय राऊत –

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून आंबेडकरांवर टीका करण्यात आली होती. त्या टीकेला आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. “मला सल्ला देणारे संजय राऊत कोण? माझी युती शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी झाली आहे. त्यांचा सल्ला मी ऐकेल. पण इतर कुणी मला सल्ला देऊ नये” अशी जळजळीत टीका आंबेडकर यांनी केली होती. तर आंबेडरांच्या आरोपावर उत्तर देत असताना, “मी कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील” असा पलटवार संजय राऊत यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 11:04 IST
ताज्या बातम्या