महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात आल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. मंगळवारी (३० जानेवारी) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितला मविआत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा अनेक वृत्तवाहिन्यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला मविआत सहभागी करून घेतल्याचं जाहीर केलं होतं. या पत्रकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या मविआतील समावेशाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेतृत्वाने (दिल्लीतलं हायकमांड) मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही.
वंचितचे प्रमुख म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमच्याशी पत्रव्यवहार करतात. परंतु, वंचितच्या मविआतील समावेशाबाबतचा निर्णय काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात घेतील, असं आम्हाला समजलं आहे. ज्या पत्रकाबद्दल सध्या चर्चा चालू आहे त्यावर केवळ नाना पटोले यांची सही आहे. त्यावर थोरात आणि चव्हाण यांची सही नाही.
हे ही वाचा >> “आम्हाला आव्हान देऊ नका, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा; धनगर आरक्षणाचा उल्लेख करत म्हणाले…
दरम्यान, वंचितला मविआत अपमानास्पद वागणूक दिली गेली असल्याचं बोललं जात आहे. तरीदेखील वंचित बहुजन आघाडी २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मविआच्या बैठकीत सहभागी होणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर आंबेडकर म्हणाले, आम्हाला तिथे कशी वागणूक मिळाली याची आम्ही मोठी समस्या निर्माण करणार नाही. कारण आमचं आधीपासून एकच म्हणणं आहे की आपल्याला देशातून भाजपाचं धोकादायक सरकार उलथून टाकायचं आहे. भाजपाला विरोध म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. अशा परिस्थितीत आम्ही किंवा इतर कोणीही वैयक्तिक हेवेदावे चर्चेत आणू नये. ‘मी’पणा आणि भाजपा-आरएसएसचं सरकार उलथून टाकणं यापैकी एका गोष्टीला प्राथमिकता द्यायची असेल तर आम्ही भाजपा-आरएसएसचं सरकार उलथून टाकण्याला अधिक महत्त्व देऊ.