Pratap Sarnaik at Marathi Protest in Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांनी नुकताच मोर्चा काढला होता. तेव्हापासून शहरात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चालू झाला आहे. दरम्यान, परप्रांतीयांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज शहरातील मराठी भाषिकांनी मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, ते अवघ्या १० मिनिटात ते तिथून निघून गेले. या १० मिनिटात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली, तसेच एका समाजकंटकाने त्यांच्या दिशेने बाटली भिरकावल्याचा प्रकारही घडला.
दरम्यान, त्या १० मिनिटात आंदोलनाच्या ठिकाणी काय-काय घडलं याबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही वेळापूर्वी विधान भवन येथे टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “आंदोलनाच्या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण होतं ते पाहता मलाही कल्पना होती की तिथे मला विरोध होऊ शकतो. परंतु, मी मोर्चात सहभागी होईन असं सांगून आलो होतो. त्याप्रमाणे मी सहभागी झालो.”
मोर्चात सहभागी होणं हे माझं कर्तव्य होतं. त्यानुसार मी मीरा भाईंदरला गेलो आणि मोर्चामध्ये सहभागी झालो. पोलिसांनी मला सांगितलं होतं की तुम्ही तिथे गेलात तर वातावरण आणखी खराब होईल. तुमच्या विरोधात घोषणाबाजी होऊ शकते. परंतु, मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की मी मराठी जनतेला शब्द दिला आहे. त्यामुळे मी मोर्चामध्ये सहभागी झालो आणि आता विधानभवनाच्या कामकाजासाठी निघालो आहे.
बाहेरचे लोक शहराचंवातावरण खराब करत आहेत : सरनाईक
यावेळी कोणीतरी सरनाईक यांच्या दिशेने बाटली फेकल्याची घटना घडली. त्यावर सरनाईक म्हणाले,
कुणी काय फेकलं याची मला कल्पना नाही. परंतु, ज्या समाजकंटकांनी ते कृत्य केलं ते शहरातील नव्हते. ते बाहेरचे लोक होते. बाहेरून आलेल्या लोकांमुळे मीरा-भाईंदर शहरामधील वातावरण खराब होत आहे हे नक्की.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सरनाईकांची मनसे व ठाकरे गटावर टीका
मनसे, मराठी एकीकरण समिती व शिवसेनेच्या (ठाकरे) नेतृत्वाखालील या आंदोलनाबाबत प्रताप सरनाईक म्हणाले, ही सगळी राजकीय नौटंकी असते. बऱ्याचदा आंदोलक काय करतात याची त्यांना कल्पना नसते. सगळं काही पूर्वनियोजित नसतं. त्यामुळे मी कोणाला दोष देणार नाही. मात्र, मी आधीच सांगितलं आहे की मी मंत्री किंवा आमदार नंतर, मी आधी मराठी आहे. मराठी लोकांनी मोर्चा आयोजित केला असेल किंवा त्यांचं आणखी काही काम असेल तर त्याला समर्थन द्यायला पाठिंबा द्यायला जाणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच मी इथे आलो. मी माझं कर्तव्य समजून आलो आणि आता मी माझ्या कामासाठी निघालो आहे.