कांद्याचे गगनाला भिडलेले भाव पुढील दहा दिवसात खाली येतील, असा दिलासा शासन पातळीवरून दिला जात असला तरी १५ नोव्हेंबपर्यंत तशी शक्यता धुसर असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. दीपावलीनिमित्त आठवडाभर बंद राहणारे बाजार उघडल्यानंतर आवक काहीशी वाढेल.  महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना कांद्यासाठी चटके सहन करावे लागणार असताना या संपूर्ण व्यवहारात केवळ व्यापाऱ्यांची चांदी होत आहे.
भाव असे फुगतात..
कांद्याचे भाव कृत्रिमरित्या वाढविले वा पाडले जातात, हे उघड गुपित आहे. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ातील संपूर्ण बाजारावर लासलगावच्या काही विशिष्ट व्यापाऱ्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे उपव्यापारी इतर बाजार समित्यांमध्ये कार्यरत आहेत. सध्या बाजार समितीत उन्हाळी कांदा प्रति क्विंटलला किमान २५०० आणि कमाल ६०११ रुपये, तर पोळ कांद्याला किमान १८०१ ते कमाल ४४०० रूपये भाव मिळत आहे. म्हणजे लिलाव होणाऱ्या कांद्याचा प्रति किलो भाव १८ ते ६० रुपयांदरम्यान आहे.
बाजारात शेतकऱ्याचा कांदा आल्यानंतर त्यातील चांगल्या दर्जाचा माल व्यापारी उच्चतम दराने खरेदी करतात. मात्र ही खरेदी अवघ्या काही टनांची असते आणि थोडय़ाच शेतकऱ्यांना तो भाव मिळतो. त्याचा गाजावाजा मात्र मोठय़ा प्रमाणावर केला जातो आणि बाकीच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी किमान पातळीवरील भावानेच केली जाते. यात चर्चा मात्र सर्वाधिक भावाचीच होते आणि त्यातूनच कांद्याचे दर फुगत जातात. सध्या देशातील बाजारात दुसऱ्या वा तिसऱ्या दर्जाच्या कांद्याची ७० ते ८० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. सध्या विक्रीसाठी येत असलेला उन्हाळी कांदा व्यापाऱ्यांचा आहे. नवा कांदा बाजारात आल्यावर दर कोसळतात याची जाणीव असल्याने कोणी शेतकरी उन्हाळी कांदा जवळ ठेवण्यास धजत नाही. बाजाराच्या सर्व नाडय़ा हाती असलेले व्यापारी आपल्या सोईनुसार आणि व्यवस्थेनुसार कांद्याचा भाव वाढविणे किंवा कमी करणे यात पारंगत आहेत.
कांदा उत्पादनाचे गणित
पावसाळ्यात लागवड होणाऱ्या पोळ कांद्याचा उत्पादन खर्च इतरांपेक्षा जादा असतो. कोणत्याही नैसर्गिक संकटांचा सामना करावा न लागल्यास साधारणत: एक एकर क्षेत्रात ६० ते ६५ क्विंटल कांद्याचे उत्पादन होते. उत्पादनाचा संपूर्ण खर्च आणि श्रम विचारात घेतल्यास शेतकऱ्यांना प्रति किलोसाठी १० ते १२ रुपये खर्च येतो. म्हणजे, प्रति क्विंटल  उत्पादन खर्च १००० ते १२०० रुपयांच्या घरात आहे.
‘कांद्याचे साठेबाज सत्ताधाऱ्यांशी संबंधित’
मुंबई : कांद्याची साठेबाजी करणारे व्यापारी व दलाल हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने दरवाढ होणार, हे गृहीत धरून आधीच आयातीचे नियोजन करायला हवे होते. देशाचे कृषिमंत्री शरद पवार हे जागतिक पातळीवरील ‘कृषीतज्ज्ञ’ असताना त्यांनी यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना आधी का दिल्या नाहीत, असा सवाल भांडारी यांनी केला. शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत दिल्याने लासलगावला काहींनी दोन दिवसांपूर्वी कांदा परत नेला. त्यामुळे कांद्याची उपलब्धता असून व्यापारी व दलाल साठेबाजी करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मंत्रालयात ‘चातुर्मास’
 मुंबई : कांद्याच्या दरवाढीची झळ मंत्रालय उपहारगृहालाही गेले काही महिने बसत असून तिथेही ‘चातुर्मास’ सुरू झाला आहे. कांदा भजी बंदच झाली असून अनेक पदार्थामधून कांदा गायब झाला आहे. मंत्रालय मुख्य इमारत, प्रशासकीय भवन, विधान भवन या ठिकाणी शासकीय उपहारगृहे आहेत. त्यासाठी रोज किमान २०० किलोहूनही अधिक कांदा लागतो. कंत्राटदाराला वर्षभराचे कंत्राट दिले जाते. त्याला १५ ते २० रुपये किलो दराने हे कंत्राट दिले गेले आहे. कांद्याचे दर प्रचंड वाढल्याने त्याने माल पाठविणेच कमी केले आहे.
एक आठवडा कांदाच खाल्ला नाही – शीला दीक्षित
जवळपास एका आठवडय़ानंतर आपण शनिवारी भेंडीच्या भाजीबरोबर कांदा खाल्ला, असे नमूद करून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी, गगनाला भिडलेल्या दराची झळ आपल्या स्वयंपाकघरालाही बसल्याचे सूचित केले. कांदा प्रतिकिलो १०० रुपये एवढय़ा दराने विकला जात असून, हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती शीला दीक्षित यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना दिली. दिल्लीतील भाजपचे सरकार १९९८ मध्ये कांद्याच्या भावावरूनच पडले होते. आता भाजप आणि आम आदमी पार्टी कांद्याच्या दरावरूनच दिल्ली सरकारवर टीका करीत आहे.