नंदुरबार: काँग्रेस देशातील हिंदूंची धार्मिक प्रतिके संपवण्याचे षडयंत्र रचत आहे तर नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याची भाषा करीत आहेत. हे दोन्ही पक्ष त्यांच्या मतपेढीला जी आवडते, तशीच भाषा करणार का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.  

नंदुरबार येथे भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर तोफ डागली. नकली शिवसेनावाले बॉम्बस्फोटातील आरोपीला प्रचारात बरोबर घेऊन फिरतात. जनतेचा विश्वास घालवून बसल्याने उद्धव ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली आहे, अशी टीका त्यांनी केली. 

आपण जिवंत असेपर्यंत आदिवासी, दलितांच्या आरक्षणाला धर्माच्या संकल्पनेवर कोणीही हात लावू शकत नाही. आदिवासी, दलितांचे आरक्षण कमी करून एक तुकडा मुसलमानांना देणार नाही, हे काँग्रेसने लिहून देण्याचे आवाहन करूनही त्यावर ते भाष्य करीत नसल्याचा आरोप मोदी यांनी केला.

हेही वाचा >>>तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”

काँग्रेसच्या शाही परिवाराप्रमाणे आपण बडय़ा घराण्यातून नव्हे तर, गरिबीतून वर आलो आहोत. त्यामुळे गरिबीची जाण आहे. सातपुडय़ातील प्रत्येक आदिवासी बांधवाला घर, प्रत्येक घरात पाणी, वीज देण्यासाठी पुढाकार घेतला. नंदुरबारमध्ये सव्वा लाख लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे दिली. अजून बरेच काही करायचे आहे. आदिवासींमधील सिकलसेल आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी भाजपने विशेष अभियान राबविले. नंदुरबारमध्ये १२ लाख लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. काँग्रेस विकासाच्या बाबतीत आपल्याशी कधीच स्पर्धा करु शकत नसल्याने त्यांनी खोटे बोलण्याचा कारखाना उघडला असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसने कधीही आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही. भाजपने आदिवासी कन्येला राष्ट्रपती केले. काँग्रेसने विरोध केला. आपली रामभक्ती आणि मंदिरात जाणे, भारतविरोधी असल्याची टीका काँग्रेस करीत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.