राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊन दिल्लीवरून पाठवण्यात आलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळातच आघाडीची लय बिघडली, अशी टीका अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी केली होती. याला पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“हा बालिशपणा आहे. देशात १०० प्रादेशिक पक्ष आहेत. दिल्लीतील नेत्यांना एवढंच काम असतं का? मला कुठलीही सुपारी किंवा कंत्राट दिलं नव्हतं. प्रशासनात स्वच्छ कारभार आणण्याच्या सूचना होत्या,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : “२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं”, चव्हाणांच्या विधानाला प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले…

सुनील तटकरे काय म्हणाले होते?

“पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारण आहेत, असा माझा समज होता. पण, अलीकडे त्यांना विनोद कुठून सुचतो, ते मला कळलं नाही. २०१४ साली नारायण राणे समितीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं नाही. मात्र, सत्ता गेल्यावर मराठा आरक्षण टिकलं नाही, असं बोलण्याला अर्थ नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

“…म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो”

“२०१४ साली राष्ट्रवादीनं मागणी केलेल्या जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. त्याआधी आमच्याकडून जागांची माहिती काढून घेतली होती. राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना सुपारी देऊन दिल्लीवरून पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे निवडणूकपूर्व युती होऊ शकली नाहीत. म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,” असं सुनील तटकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेस चौथ्या क्रमाकांवर गेली”

“पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळाताच आघाडीची लय बिघडली. पण, विलासराव देशमुख हे आघाडीचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला सतत पाण्यात पाहण्याचं काम केलं. पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेस चौथ्या क्रमाकांवर गेली आहे,” असा आरोपही सुनील तटकरेंनी केला.