लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता हळूहळू वेग येत असल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच तापमानाचा पारा वाढून तो ४१ अंश डिग्रीच्या पुढे गेल्यामुळे त्याचा फटका प्रचार यंत्रणेला बसू लागला आहे. सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये वाढत्या तापमानामुळे प्रबळ उमेदवारांचा प्रचार शक्यतो सायंकाळी ऊन उतरल्यानंतर होत असस्याचे दिसून येते.
गेल्या आठवडय़ापासून सोलापूर जिल्ह्य़ातील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. आठवडय़ापूर्वी ३५ ते ३६ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत असलेले तापमान आता वाढत जाऊन ४१ अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सकाळी अकरानंतर रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ थंडावलेली दिसून येते. सायंकाळी पाचनंतर बाजारपेठांतील व्यवहार सुरू होत असल्यामुळे तेथील वर्दळ सायंकाळनंतरच वाढू लागल्याचे चित्र पाहावयास मिळते. दुपारी बाजारपेठांतील शुकशुकाट, नागरिक व कार्यकर्त्यांचा निरुत्साह यामुळे प्रचाराला खंड पडतो. सायंकाळनंतर रात्री दहापर्यंत प्रचार करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग करून शक्यतो सायंकाळी व रात्रीच प्रचारसभांचे आयोजन करण्यावर प्रमुख उमेदवारांचा भर दिसून येतो.
सोलापुरात काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्याच्या नावाखाली संपूर्ण मतदारसंघांमध्ये जनसंपर्क वाढविला असून त्यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रचाराच्या दोन फे ऱ्या पूर्ण केल्याचे सांगितले जाते. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या सर्व ठिकाणी शिंदे यांच्या सभा व मेळावे झाले. शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचेसर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कडाक्याच्या उन्हात हजेरी लावली व जाहीर सभा घेतली. माढय़ात शरद पवार यांच्या करमाळा, कुर्डूवाडी आदी भागात जाहीर सभा झाल्या. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभा दक्षिण सोलापूर व अक्कलकोट परिसरात झाल्या. सुशीलकुमारांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. परंतु उन्हाचा तडाखा सहन करताना उज्ज्वला शिंदे यांना डोळ्यावर सतत काळा गॉगलचा वापर करावा लागत आहे. तर महायुतीचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांनी उन्हा-तान्हाची पर्वा न करता मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. आतापर्यंत भाजपचे प्रदेश पातळीवरचा एकही नेते आला नाही. परंतु वाढत्या तापमानामुळे बनसोडे यांना सायंकाळनंतर प्रचार करणे भाग पडत आहे.
इकडे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सांभाळणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पक्षाचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी माळशिरस, करमाळा, माढा-कुर्डूवाडी, सांगोला तसेच फलटण व माळ भागात जाहीर सभा घेतल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांचा जाहीरसभांवर प्रमुख भर असला, तरी त्यांच्या सभा सायंकाळनंतर होतात. त्यांच्यासाठी आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी, शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी जाहीर सभा घेतल्या. तर अपक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना उन्हात स्वतंत्रपणे प्रचार करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे. विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या बहुतांश सभा सायंकाळी ऊन उतरल्यानंतरच होत असल्याचे दिसून येते. रखरखत्या उन्हामुळे दुपारी कार्यकर्ते बाहेर पडायला तयार नाहीत. मतदारसंघात कोठेही सार्वजनिक रस्त्यावर प्रचाराचे फलक दिसत नाहीत. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करून प्रचाराचा धुराळा उडतानाही दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण शांत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2014 रोजी प्रकाशित
वाढत्या तापमानाचा प्रचाराला फटका
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता हळूहळू वेग येत असल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच तापमानाचा पारा वाढून तो ४१ अंश डिग्रीच्या पुढे गेल्यामुळे त्याचा फटका प्रचार यंत्रणेला बसू लागला आहे.

First published on: 02-04-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem to promotion of increasing temperature