सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी, आहेरवाडी परिसरातील एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी जमीन गेलेल्या एका शेतकरी कुटुंबातील मिथुन धनू राठोड (वय ४०) या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी मिथुनचा मृतदेह एनटीपीसी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता.
एनटीपीसी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी पूर्वी मोबदला दिलेला आहे. मात्र, वाढीव मोबदला मिळावा, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्याला एनसीटीसी प्रकल्पात नोकरी मिळावी, ही राठोड यांची मागणी होती. यासाठी त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी केला आहे. घटनेनंतर मिथुन यांचा मृतदेह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी एनटीपीसी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणून ठेवला आणि धरणे आंदोलन सुरू केले. याच वेळी संतप्त जमावाने प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर तुरळक दगडफेक केली. यातच एनटीपीसी प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी न आल्यामुळे वातावरण आणखी चिघळले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक धावून आली. या वेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व अन्य नेते मंडळींनीही घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात एनटीपीसी सोलापूर औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे कार्यकारी संचालक जगदीशचंद्र शास्त्री यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.