कर्जत: शहरात दीडशे कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) याकडे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात अजय बोरा, अजय भैलुमे, भूषण ढेरे, रजाक झारेकरी, नामदेव थोरात, अल्ताफ सय्यद, रघुनाथ काळदाते, ऋषिकेश धांडे, राजेंद्र पवार, महेंद्र थोरात, सागर सुर्वे, रमेश कचरे आदी सहभागी झाले होते.

कर्जत शहरासह परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. वारंवार अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत. कर्जत-राशीन, कुळधरण रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनांचेही नुकसान होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. आज गांधीगिरी करून आंदोलन करण्यात आले. मात्र, पुढील काळात आंदोलन गांधीगिरीचे राहणार नाही, असा इशारा यावेळी नामदेव राऊत त्यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

१५० कोटींच्या रस्त्यावरही खड्डे

कर्जत शहरातील मुख्य रस्ता १५० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला. मात्र, या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला गटारी बांधण्यात आल्या. मात्र, त्यामधून पाणी वाहत नाही. देखभालीची जबाबदारी ठेकेदाराची असूनही उपाययोजना केल्या जात नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे, असे नामदेव राऊत म्हणाले.

जामखेड श्रीगोंदा ते खड्डेमय रस्ते

कर्जतसह जामखेड, श्रीगोंदे परिसरातील रस्त्यांचीही बहुतांशी दुरावस्था झाली आहे. अतिवृष्टी होण्यापूर्वीच रस्ते खराब झाले होते. अतिवृष्टीमुळे तर त्यामध्ये मोठी भर पडली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याने डबके निर्माण होऊन अपघातही होऊ लागले आहेत. अतिवृष्टीने ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे पुलांचे कठडे तुटले, जोड रस्ते वाहून गेले. खड्डे रूंदावले आहेत. त्यामुळे परिसरात दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमाल बाजारपेठेत आणण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना पाण्यातून जावे लागत आहे. राज्य सरकारने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे हे महिन्यात व गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी केली होती, मात्र पुन्हा अतिवृष्टी झाल्यानंतर रस्त्यांच्या नादुरुस्तींमध्ये वाढ झाली आहे.