राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दुकानांमधून वाइन विक्री करण्याचे जाहीर केलेले धोरण मागे घ्यावे अन्यथा, दंडवत घातल्यानंतर दंडुक्याचे आंदोलन महागात पडेल, असा इशारा व्यसनमुक्त युवक संघाने दिला आहे.
साताऱ्याच्या पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून, व्यसनमुक्त युवक संघाच्या भव्य मोर्चास प्रारंभ झाला. संघाचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा प्रारंभी अडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आक्रमक मोर्चेकऱ्यांनी आपल्याकडील दंडुके पोलिसांकडे सुपूर्द केल्याने मोर्चा सुरू होऊन तो जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला. मोर्चात व्यसनमुक्त युवक संघाचा तसेच साधुसंतांचा जय जयकार करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला राज्य शासन चुकीचे निर्णय घेऊन काळिमा फासत असल्याबद्दल महाविकास आघाडीचा धिक्कार करण्यात येत होता. घोषणाबाजीमुळे सारा परिसर दणाणून गेला होता. मोर्चात युवतींबरोबरच वयोवृध्द महिलांचाही सहभाग होता. व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना राज्य शासनाच्या वाइन विक्रीच्या नव्या धोरणावर सडकून टीका केली.
यावेळी राज्य सरकारला जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, “देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य शासनाने दारू विक्रीचे सार्वत्रीकरण करून, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या दारूमुक्त राष्ट्र या संकल्पनेला तिलांजली वाहिली आहे. वाइन कंपन्यांमध्ये राजकीय नेत्यांची भागीदारी गुंतलेली असल्यानेच असा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्या डोक्यात असे सडके विचार येतातच कसे? वाईन म्हणजे दारू नव्हे असे सांगताना तुम्ही लाज गहाण ठेवली आहे का? राज्य शासनाने महाराष्ट्राला दारूच्या नशेत बुडवण्याचे कार्य हाती घेतले आहे का? असे प्रश्न उपस्थित करून, तसे असेलतर रेशनिंगवर वाईन उपलब्ध करून देऊन प्रत्येक कुटुंबाने ती घेतलीच पाहिजे अशी सक्ती करा म्हणजे रेशनिंगच्या काळया धंद्यात आणखी मलिदाही मिळेल आणि महसूल वाढण्यात यशस्वी व्हाल.”
“शेतकऱ्यांच्या द्राक्ष डाळिंब अशा फळांचे करायचे काय?, हा प्रश्न राज्य शासनाला भेडसावत असेलतर त्यांनी ही फळे शालेय पोषण आहारातून मुलांना द्यावीत. कुपोषित आदिवासी मुलांनाही या खाद्याचा लाभ द्यावा पण असे न करता केवळ महसूल वाढ आणि वाइन कंपन्यांच्या भल्यासाठी दुकानांमधून वाइन विक्रीचा निर्णय दुर्दैवी आहे. तरी तो तात्काळ मागे घ्यावा अन्यथा, आज दंडवत घेतलेला दंडुका आम्हाला सरकार विरोधात उगारावा करावा लागेल आणि त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील तरी लोक भावनांचा विचार करावा,” असा इशारा देण्यात आला आहे.
