अलिबाग: तुमची जुनी गाडी विकत असाल, अथवा तुम्ही जर जुनी गाडी खरेदी करत असाल तर त्याची माहिती आता पोलीसांना देणे बंधनकारक असणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहीता कलम २२३ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दहशतवादी कारवाया व गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचा संपूर्ण तपशील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. वाहन दुरुस्तीची दुकाने, लहान गॅरेज तसेच खासगी व्यापाऱ्यांकडून मोटारसायकली व इतर वाहने विक्रीस येत असतात. परंतु या व्यवहाराचा सविस्तर तपशील न ठेवला गेल्याने चोरीच्या वाहनांची देवाणघेवाण वाढत आहे. देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये चोरीच्या मोटारसायकलींचा वापर झाल्याची उदाहरणे नोंदली गेली आहेत. गंभीर गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांना वाहनांच्या मालकांचा व खरेदीदारांचा तपशील उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येतात.
जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी प्रत्येक सात दिवसांनी स्थानिक पोलीस ठाण्याला व्यवहाराचा तपशील द्यावा. या तपशिलात वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, मूळ मालकाचे नाव, कायमचा व सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, आरसीटीसी बुक यांचा समावेश असणे बंधनकारक असणार आहे. तसेच खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्राची माहिती देणे देखील आवश्यक असणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल. यात दंड तसेच इतर शिक्षेची तरतूद आहे. हा निर्णय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने घेतला असून त्यामुळे जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आहे.