कराड : पुणे-बंगळूरू महामार्गावर कराडजवळील उड्डाणपुलाचे काम वैशिष्टय़पूर्ण ठरणार आहे. कराडजवळील या एकखांबी पुलाची रुंदी २९.५ मीटर आहे. त्याच्या खाली चार व वर चार असे आठ आणि एकूण १४ पदर असल्यामुळे कराड ते मलकापूर अशा सततच्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याचे मोठे नियोजन आहे.

शेंद्र ते कागल सहापदरीकरणाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत प्रत्यक्षात गतीने सुरू होत आहे. केंद्र सरकारने या एकूण कामासाठी ४ हजार ४८९ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कामाचा शुभारंभ झाला होता. आता, हे काम प्रत्यक्ष सुरू होत आहे. या कामाचा मुख्य ठेका अदानी उद्योग समूहाकडे असून, सहठेकेदार म्हणून डी. पी. जैन कंपनी काम करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कराड व लगत असलेल्या मलकापूर शहरांच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यासाठी  भल्यामोठय़ा आठ यंत्रांचा वापर करून हे पाडकाम ४५ दिवसात पूर्ण होण्याचा अंदाज आहे.  एक विशेष म्हणजे जेव्हा हा पूर्ण पूल पाडला जाईल त्यावेळेला जी सामग्री उरेल ती टाकावू होणार नसून, हे सर्व साहित्य बांधकामात उपयोगात आणले जाणार आहे.  इथे जो उड्डाणपूल नव्याने बनवणार आहे, तो अद्वितीय (युनिक) असणार आहे. हा पूल २० ते २२ महिन्यात पूर्ण करण्याचा सहकंत्राटदारांचा प्रयत्न राहणार आहे. या एकूणच कामात सध्याच्या रस्त्याकडेची १० हजार ८८० झाडे तोडावी लागतील आणि त्याऐवजी नवीन ५५ हजार झाडे ठेकेदार लावून देणार आहे. या दोन वैशिष्टय़पूर्ण उड्डाणपुलासह १३३ किलोमीटरच्या सातारा ते कागल अशा सहापदरीकरणातील ६७ किलोमीटर लांबीचा सुसज्ज रस्ता ठेकेदार व सहठेकेदार कंपनीने सुमारे  २३ महिन्यात पूर्ण करण्याचा विश्वास दिला आहे.