पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावरील बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीत कराडहून पुण्याकडे निघालेल्या वडाप जीपचा अ‍ॅक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या जीपमधून प्रवास करणारे बहुतांश लोक काले, उंडाळेसह कराड तालुक्यातीलच होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर नाका परिसरातून दररोज काही जीप कराड ते पुणे अशी वडाप वाहतूक करतात. या जीपपैकीच एक जीप सोमवारी सकाळी सातच्या सुमारास कराडहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी जीपमध्ये सुमारे 12 ते 13 लोक होते. बेलवडे गावच्या हद्दीत भरधाव वेगातील जीपचा अचानकपणे अ‍ॅक्सल तुटल्याने चालकाचा जीपवरील ताबा सुटून ती तीन ते चारवेळा पलटी होऊन महामार्गावरून सेवा रस्त्यालगतच्या एका हॉटेलच्या फलकाला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

दरम्यान, अपघातातील मृत व्यक्तींसह जखमींच्या नावाची सत्यता पडताळण्याचे काम तळबीड पोलिसांकडून सुरू आहे. सर्व जखमीवर कराडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.