शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत असतानाच आता नवीन खुलासा समोर आलाय. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ म्हणजेच टीईटीसाठी (टीचर्स एलिजीबिलीट टेस्ट) अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आल्याचं सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडालीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठवरण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तरपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जातेय. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र असल्याचं समोर आलं. असं असतानाही या सर्वांना पात्र असल्याचं दाखवण्यात आल्याची माहिती उघड झालीय.

२०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून झालेल्या भरतीमधील शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत का याची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने नुकताच घेतलाय. यासाठी राज्यामधील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांना तपासासंदर्भातील आदेश देण्यात आलेत. पुणे सायबर पोलीस सध्या २०१८ आणि २०२० मधील टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत.

तरी या परीक्षेमध्ये २०१३ पासूनच घोटाळा होत असल्याचा आरोप केला जातोय. याच पार्श्वभूमीवर मागील आठ वर्षांचे निकाल आणि प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात ाला आहे. मागील १५ दिवसांमध्ये राज्यातील साडेपाच हजार शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे पाठवण्यात आलीयत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune cyber police investigation in tet examination scam revels 7800 non eligible candidates shown as cleared scsg
First published on: 28-01-2022 at 10:59 IST