कर्जत : कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाने आज पासून एक स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम राबविला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या पुढाकारातून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि भेट देणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आचारसंहिता तयार करण्यात आली असून त्याची मोठे फलक महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आला आहे.
आजच्या काळात उच्च शिक्षण संस्थांकडे केवळ शैक्षणिक ज्ञान देणारी केंद्रे म्हणून न पाहता, तरुण पिढीला संस्कार, मूल्ये आणि शिस्त शिकविणारी केंद्रे म्हणूनही पाहिले पाहिजे. समाजातील अस्थिरता, गैरव्यवहार, शिस्तभंगाच्या घटना, खास करून विद्यार्थिनींच्या बाबतीत विविध घटना राज्यामध्ये शाळा व महाविद्यालयात घडत आहे. यामध्ये सतत वाढ होत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या पुढाकारामधून एक क्रांतिकारी उचललेले हे पाऊल नक्कीच वेगळे भासते.
विद्यार्थी हा समाजाचा भविष्यातील नागरिक असतो. तो जर शिक्षणासोबत नैतिक मूल्ये, शिस्त आणि जबाबदारी आत्मसात करेल, तर पुढची पिढी अधिक सक्षम होईल यात शंका नाही. महाविद्यालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार तात्काळ कारवाई होईल. म्हणजेच केवळ फलक लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची तयारी महाविद्यालयाने दाखविली आहे. हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
या आचारसंहितेचे अनावरण पोलिस निरीक्षक संजय शिरसाठ आणि पोलीस उपनिरीक्षक रझीज मुलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्त राखण्यात पोलिस दलाचे योगदान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. त्यामुळे अनावरणाच्या वेळी पोलिसांची उपस्थिती या संकल्पनेला अधिक बळ देणारी ठरली.
कर्जत तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. त्यामुळे दादा पाटील महाविद्यालयाने इतर महाविद्यालयांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आज अनेक ठिकाणी महाविद्यालयीन पातळीवर शिस्तीचा अभाव, गैरसोयीच्या घटना, वादविवाद किंवा तणावाचे वातावरण दिसून येते. अशा पार्श्वभूमीवर आचारसंहिता लावून तिचे काटेकोर पालन करण्याचा संदेश हा काळाची गरज आहे.
प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर
शिस्त, जबाबदारी आणि नैतिक मूल्ये या त्रिसूत्रीवर समाजाचे भविष्य उभे असते. शिक्षण ही केवळ रोजगार मिळविण्याची साधने नव्हे, तर सुसंस्कारित पिढी घडविण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत दादा पाटील महाविद्यालयाचा उपक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.