राहाता: तीर्थक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनातून श्रीक्षेत्र निधर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पर्यटक आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या परिसराचे वैभव अधिक वाढविण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.
श्रावणानिमित मंत्री राधाकृष्ण विखे आणि शालिनीताई विखे यांनी श्री क्षेत्र निधर्णेश्वर येथे अभिषेक केला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातून भाविक केवळ श्रावणातच नाहीतर आता निसर्ग पर्यटन म्हणूनही येत आहेत. या परिसराच्या विकासासाठी कधीही निधीची कमतरता भासू देणार नाही. परिसराला पाणी उपलब्ध करण्यासाठी वनतळ्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणी उपलब्ध झाल्यास इथली वनराई अधिक वाढेल. निसर्ग पर्यटनाला त्याची मदत होईल. दुधेश्वर डोंगरावरही वन विभागाने निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने आराखडा तयार करावा, त्यालाही निधी देण्याची ग्वाही विखे यांनी दिली. श्रावणानिमिताने होणारी गर्दी लक्षात घेऊन संरक्षण व्यवस्था चोख बजावण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. मंदिर विश्वस्त समितीचे मच्छिंद्र थेटे यांनी त्यांचे स्वागत केले.