राहाता : प्रवरा सहकारी बँकेची आगामी आर्थिक वर्षांची वाटचाल एक हजार कोटी ठेवींच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणार असून एक महिन्यात बँकेचा कारभार ऑनलाइन होईल. शून्य टक्के नेट एनपीए असलेली ‘प्रवरा’ ही जिल्ह्यातील पहिली बँक ठरल्याचे गौरवोद्गार बँकेचे मार्गदर्शक, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले. यावेळी त्यांनी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले.
प्रवरा बँकेच्या ५१ व्या वार्षिक सभेत मंत्री विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, सहायक निबंधक नामदेव ठोंबळ, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ बालोटे तसेच सभासद उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, बँकेने ८४५ कोटी ठेवींचा पल्ला गाठला व एकूण व्यवसाय १ हजार ३७१ रुपयांचा केला. बँकेचा नावलौकिक राज्यात वाढला आहे. याचे श्रेय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ बालोटे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. केवळ मोठ्या लोकांनाच कर्ज न देता छोट्या व्यावसायिकांना अर्थसाहाय्य करून त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून द्यावे.
मंत्री विखे लाभांशाची घोषणा करताच सभेदरम्यानच सभासदांच्या खात्यावर लाभांश जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष डॉ. खर्डे यांनी, बँकेला ५ कोटी ८० लाख रुपयांचा नफा झाल्याची, गुंतवणूक ३७९ कोटी तर कर्जवितरण ५२६ कोटी असल्याची माहिती दिली. स्व. बाळासाहेब विखे पाटलांची दूरदृष्टी व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ग्राहकाभिमुख कारभार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्याधुनिक इमारत बांधावी – सुजय विखे
डॉ. सुजय विखे यांनी बँकेने नवीन इमारत बांधण्याचा ठराव ऐनवेळी मांडला. ते म्हणाले, बँकेची इमारत जुनी व बहुमजली असल्याने दिव्यांग, वयोवृद्ध नागरिक, महिला यांना त्रास होतो तसेच बँकेचे मुख्य कार्यालय प्रशस्त असावे, प्रवरा बँकेचे सर्व व्यवहार लवकरच ऑनलाइन होतील. त्यामुळे ग्राहकांना ये-जा करण्यासाठी सुलभ वाटेल, अशी बँकेच्या मुख्य कार्यालयाची अत्याधुनिक इमारत हवी. पुढील वार्षिक सभेपर्यंत नवीन जागेत नवी इमारत उभी करावी. या ठरावाला डॉ. खर्डे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केला.